पुणे(प्रतिनिधी) – हिमाचल प्रदेशातून पुण्यात विक्रीसाठी चरस घेऊन आलेल्या एकास खंडणी विरोधी पथकाने(2) जेरबंद केले. त्याने एसयूव्हीच्या मागील दरवाजाच्या टफच्या कुशनमध्ये चरसची पिशवी लपवली होती. रस्त्यात पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्याने सोबत गावातील एक विधवा महिला व तीच्या दोन मुलींना आणले होते. त्यांना पुणे शहर दाखवण्याच्या बहाण्याने सोबत घेतले होते. कारवाई झाल्यावर संबंधीत कुंटूंबाला मोठा धक्का बसला होता.
विरेंद्र धातुराम शर्मा (40,रा.मनाली, जि.कुल्लू, हिमाचल प्रदेश) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 1 किलो 905 ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आले. याची किंमत बाजारात 11 लाख 43 हजार रुपये इतकी आहे. त्याचा मोबाईल आणी एसयूव्ही मिळून 16 लाख 53 हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
पथक जाणार हिमाचलमध्ये…..
आरोपीने गावातील एक विधवा महिला व तीच्या दोन मुलींना तुम्हाला पुण्यात फिरायला नेतो असे आमिष दाखवले होते. त्यावर विश्वास ठेऊन संबंधीत कुटूंब त्याच्या सोबत आले होते. खंडणी विरोधी पथकाने कारवाई केल्यावर संबंधीत कुटूंबाला मोठा धक्का बसला होता. रेल्वे पोलिसांनी मध्यंतरी कारवाई करत हिमाचल प्रदेशातून आलेला अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला होता. यानंतर पुन्हा एकदा अंमली पदार्थ व हिमाचल प्रदेशचे कनेक्शन उघड झाले आहे. याप्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे एक पथक हिमाचल प्रदेशात जाणार आहे.
हिमाचल प्रदेशातून एक एसयूव्ही पुण्यात अंमली पदार्थ घेऊन येत असल्याची खबर खंडणीविरोधी पथकातील पोलीस अंमलदार प्रदीप गाडे यांना मिळाली होती. त्यानूसार पोलीस तांत्रीक व इतर माध्यमातून आरोपीच्या गाडीच्या मागावर होते. ही गाडी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खडकी पोलिसांच्या हद्दीत आल्यावर पोलिसांनी सापळा लावून अडवली. गाडी व चालकास ताब्यात घेऊन झाडाझडती घेण्यात आली. मात्र गाडीत काहीही न सापडल्याने पोलिसांनी गाडीचे कुशन व इतर गोष्टी उलगडून कसून तपासणी केली. तेव्हा गाडीच्या मागच्या दरवाजाच्या टफच्या कुशनमध्ये चरसची पिशवी लपवलेली आढळली.
ही कारवाई उपायुक्त बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, फौजदार संपत औचरे, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, विजय गुरव, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, प्रदिप नाडे, भूषण शेलार, मोहन येलपले, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.