जप्त केलेले तब्बल 103 किलो सोने गायब!

सीबीआयकडून अंतर्गत चौकशी सुरू

नवी दिल्ली  – सीबीआयने 8 वर्षांपूर्वी जप्त केलेल्या 400 किलो सोन्याच्या साठ्यातील तब्बल 103 किलो सोने गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मद्रास उच्च न्यायालयाने तपासाचा आदेश दिल्याने ते प्रकरण चव्हाट्यावर आले. आता गायब सोन्याचा शोध घेण्यासाठी सीबीआयने अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.

तामीळनाडूची राजधानी चेन्नईस्थित सुराणा कॉर्पोरेशन लि. ही कंपनी सोने-चांदी आयातीबाबत अधिकाऱ्यांकडून केल्या जात असलेल्या मेहेरनजरेवरून रडारवर आली. त्या कंपनीच्या कार्यालयावर सीबीआयने 2012 यावर्षी छापा टाकला.

त्यावेळी सोने आणि दागिन्यांचा साठा जप्त करण्यात आला. तो साठा सुराणा कंपनीच्या कार्यालयातील व्हॉल्टमध्ये सील करून ठेवण्यात आला. ते व्हॉल्ट काही महिन्यांपूर्वी न्यायालयाच्या आदेशावरून कंपनीचे लिक्विडेटर आणि बॅंक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उघडण्यात आले. व्हॉल्टचे सील कायम असूनही त्यातून सोने गायब झाल्याचे समोर आले.

न्यायालयाने शुक्रवारी सोने गायब झाल्याप्रकरणी तामीळनाडू सीआयडीला तपासाचा आदेश दिला. त्या सुनावणीवेळी सीबीआयनेही आपली बाजू मांडली. स्थानिक पोलिसांनी तपास केल्यास आमची प्रतिष्ठा कमी होईल, अशी भूमिका सीबीआयकडून मांडण्यात आली. मात्र, न्यायालयाने ती भूमिका फेटाळून लावली.

त्यामुळे सीबीआयवर अंतर्गत चौकशी सुरू करण्याची वेळ आली आहे. सोने साठ्याच्या जप्तीत सहभागी असलेले सीबीआयचे बहुतांश अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे अंतर्गत चौकशी पूर्णत्वास नेण्याचे मोठे आव्हान सीबीआयपुढे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.