वेलिंग्टन : न्यूझीलंडचा माजी फलंदाज रॉस टेलर सध्या त्याच्या ‘रॉस टेलर: ब्लॅक अँड व्हाईट’ या आत्मचरित्रामुळे चर्चेत आहे. टेलरने या पुस्तकात असे काही खुलासे केले आहेत, ज्यांनी भारतीय क्रिकेट हादरले आहे. माजी किवी फलंदाजाने त्याच्या आत्मचरित्रात सांगितले की, आयपीएल २०११ दरम्यान राजस्थान रॉयल्सच्या मालकांपैकी एकाने त्याच्या कानाखाली मारली होती, कारण तो पंजाब किंग्ज (किंग्ज इलेव्हन पंजाब) विरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद झाला. या खुलाशानंतर आता टेलरने आणखी एक खुलासा केला आहे. यावेळी त्याने वीरेंद्र सेहवागबाबत नवा बॉम्ब फोडला आहे. मात्र, टेलरचा हा खुलासा सेहवागच्या फलंदाजीच्या टिप्सबाबत आहे.
टेलर आणि सेहवाग आयपीएलच्या 2012 च्या आवृत्तीत दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) चा भाग होते. त्यावेळी टेलर त्याच्या वाईट टप्प्यातून जात होता. दिल्लीने टेलरला 1.3 दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतले होते आणि अशा परिस्थितीत फ्रॅंचायझीसाठी धावा काढण्याचे त्याच्यावर दबाव होता.
टेलरने आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, “मी दबावात फलंदाजी करत असताना सेहवाग मैदानाच्या चौफेर फलंदाजी करत होता. माझ्या चेहऱ्यावर दबाव स्पष्ट दिसत होता. तेव्हा लहरी पद्धतीने फलंदाजी करणारा सेहवाग माझ्याकडे आला आणि त्याने मला धक्काबुक्की केली आणि म्हणाला, ‘रॉस, तू जशी कोळंबी खात होतास तशीच फलंदाजी कर’.
खरंतर या सामन्याच्या एक दिवस आधी टेलरने सेहवागसोबत एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन कोळंबीचा आस्वाद घेतला होता. टेलरने आयपीएलमध्ये दिल्लीसाठी फक्त एकच हंगाम खेळला, त्याने १६ सामन्यांमध्ये २५६ धावा केल्या.