सेहवागने दिली बीसीसीआयला गंमतीशीर ऑफर
नवी दिल्ली – भारतीय संघाचे जवळपास 10 खेळाडू दुखापतीने जायबंदी झाले आहेत त्यामुळे शुक्रवापासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होत असलेल्या चौथ्या कसोटीत भारतीय संघात कोण खेळाडू खेळतील हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच माजी कसोटीपटू व आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाने आपण या कसोटीत खेळू शकतो, अशी गंमतीशीर ऑफर बीसीसीआयला दिली आहे.
सिडनी कसोटी अनिर्णित राखल्यामुळे भारतीय संघाची मालिकेत बरोबरी झाली आहे. मात्र, या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच अनेक खेळाडूंना दुखापती झाल्या होत्या. भुवनेश्वर कुमार व ईशांत शर्मा यांना दुखापतीने या मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. प्रत्यक्ष दौरा सुरू झाल्यापासून सिडनी कसोटी संपेपर्यंत त्यात सातत्याने भर पडत आहे. आता चौथ्या कसोटीत तर कोणत्या खेळाडूंना खेळवायचे हाच मोठा प्रश्न संघासमोर निर्माण झाला आहे.
सेहवागने याच संधीचा लाभ घेत एक गंमतीशीर ट्विट करत थेट बीसीसीआयलाच ऑफर दिली असून त्याचे हे ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होत असून त्याला प्रचंड लाईक्स मिळत आहेत. सिडनी कसोटीत जबरदस्त संयमी फलंदाजी केलेला हनुमा विहारी व रवीचंद्रन अश्विन यांच्यासह नेटमध्ये सराव करताना मयंक आग्रवालही जायबंदी झाला असल्याने अंतिम 11 खेळाडू कसे निवडले जाणार असा प्रश्न आहे. त्यामुळेच आपण आजही भारतीय संघासाठी सलामीला फलंदाजी करू शकतो, असे आपल्या ट्विटमध्ये सेहवागने म्हटले आहे. येत्या शुक्रवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.
दुखापतग्रस्त खेळाडू – महंमद शमी, उमेश यादव, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह, मयंक आग्रवाल व रवीचंद्रन अश्विन.