‘सीडबॉल’ निर्मितीतून दिव्यांगांना रोजगार, पर्यावरणाचेही संवर्धन

आस्था हॅण्डीक्राफ्टचा व्हिजन ग्रीन इंडिया संकल्प

पिंपरी – दिव्यांग बांधवांना रोजगार मिळावा आणि पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, यासाठी आस्था हॅण्डीक्राफ्ट या संस्थेने “व्हिजन ग्रीन इंडिया’ हा उपक्रम राबविला आहे. शेणखत आणि मातीचा गोळा तयार करून त्यात झाडांच्या बिया टाकायच्या. त्यांचे आकर्षक पॅकिंग करून ते भेटवस्तू स्वरूपात देण्यास सुरवात केली आहे.

 

लॉकडाऊनच्या काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यास दिव्यांग बांधव तरी कसे अपवाद असणार? अनेक दिव्यांग बांधवांच्या नोकऱ्या गेल्याने त्यांच्यापुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ही बाब आस्था हॅण्डीक्राफ्ट या संस्थेच्या निदर्शनास आली. दिव्यांग बांधवांच्या हाताला रोजगार मिळावा आणि पर्यावरणाचेही संवर्धन व्हावे, या संकल्पनेतून सीडबॉलच्या निर्मितीचा उपक्रम समोर आला.

याबाबत बोलताना आस्था हॅण्डीक्राफ्टचे संस्थापक अध्यक्ष पराग कुंकूलोळ म्हणाले की, “”दिव्यांग बांधवांच्या व्यथा, वेदना आणि गरजा या वेगवेगळ्या आहेत. हरित भारताचे स्वप्न पाहण्यासाठी दिव्यांग बांधवांकडे दृष्टी नसली तरी दूरदृष्टी आहे.

सीडबॉलच्या निर्मितीतून फायदा किंवा तोटा हे पाहण्यापेक्षा दिव्यांग बांधवांसाठी रोजगार निर्मिती हा घटक आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. लाकडी किंवा कागदी आकर्षक बॉक्‍समध्ये हे सीडबॉल पॅकिंग केले जातात. अनेक कार्यक्रमांत पुष्पगुच्छ भेट म्हणून देतात. तसेच मल्टिनॅशनल कंपन्याही आलेल्या पाहुण्यांना भेट देतात. त्याऐवजी आता सीडबॉलचा पर्याय समोर येत आहे.”

“आस्था हॅण्डीक्राफ्ट या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला रोजगार मिळालेला आहे. माती आणि शेणखताच्या गोळ्यात फळे, फुले आणि सावली देणाऱ्या झाडांच्या बीया आम्ही टाकतो. त्यातून पुढे झाडांची रोपे तयार होतात. आम्ही निसर्ग पाहू शकत नसलो तरी त्याचे महत्त्व आम्हाला माहिती आहे.”
– शीतल यादव (दिव्यांग)

“करोनामुळे आमच्या बांधवांचे रोजगार गेले आहेत. अशातच आमच्या दिव्यांग बांधवांना आस्था हॅण्डीक्राफ्टच्या माध्यमातून रोजगार मिळाल्याने आम्ही समाधानी आहोत. यातून पर्यावरणाचे संवर्धन होणार असल्याने कामाचे समाधान मिळते.”
– शब्बीर बेग (दिव्यांग)

असे करतात सीडबॉल
शेणखत आणि माती ओलसर करून एकत्र केली जाते. दिव्यांग बांधव त्याचा छोट्या आकाराचा गोळा तयार करतात. या गोळ्यामध्ये त्यांना दिलेली झाडाची “बी’ टाकली जाते. त्या ओल्या गोळ्यावर चाळलेले शेणखाताचे कोरडे आवरण लावून ते एक दिवस सुकविले जाते. सुकविलेले गोळे आर्कषक पॅकिंग करून बाजारात विक्रीसाठी पाठविले जातात. नामांकित ऑनलाइन विक्री करणाऱ्या संकेतस्थळावर याच सीडबॉलच्या पाकिटांची किंमत दोनशे रुपये आहे. मात्र दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या सीडबॉलची अवघ्या 50 ते 60 रुपयांत विक्री केली जाते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.