“बघतोय काय?’ वरून म्हाळुंगेत हाणामारी

पिंपरी – एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांमध्ये एकमेकांकडे बघण्यावरून वाद झाला. दोन्ही गटांनी एकमेकांना लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 1) दुपारी तीनच्या सुमारास महाळुंगे येथील एका हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सुरज मनोज दगडे (वय 19, रा बावधन बुद्रुक, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. निखिल विजय दगडे (रा. बावधन बुद्रुक, ता. मुळशी) आणि त्याच्या तीन साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सुरज याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सुरज त्याच्या मित्रांसोबत महाळुंगे येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपीने “तू आमच्याकडे कशाला बघतोस’ असे म्हणत सुरज यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. ही भांडणे सोडविण्यासाठी सुरजचा मित्र कुमार आरडे हा आला असता त्याला देखील मारहाण केली.
अक्षय राजेंद्र चांदेरे (वय 19, रा. विरभद्र नगर, बाणेर) यांने परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. सुरज मनोज दगडे (वय 19), कुमार रमेश आरडे (दोघे रा. बावधन) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

अक्षय याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अक्षय त्याच्या मित्रांसोबत जेवण करण्यासाठी महाळुंगे येथील एका हॉटेलमध्ये गेला होता. त्यावेळी आरोपी सुरज हा अक्षय याचा मित्र निखिल याच्याकडे बघत होता. याबाबत “काय बघतोस’ असे विचारल्यावरून आरोपींनी निखिलला शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारून जखमी केले. अक्षय भांडणे सोडवित असताना आरोपींनी अक्षयला देखील मारहाण केली.

Leave A Reply

Your email address will not be published.