नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणात पुन्हा एकदा परिवारवाद आणि भाई भतीजावादाचा उल्लेख केला. घराणेशाहीच्या राजकारणावर टीका करताना त्यांनी या दोन बाबींचा उल्लेख केला व हे भारतासमोरचे सगळ्यांत मोठे आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, पंतप्रधानांचे हे भाषण झाल्यावर लगेचच त्यांच्यावर सोशल मीडियावर टीकेचा भडीमार सुरू झाला आहे. राजकीय पक्षांनीही यावरून पंतप्रधानांना लक्ष्य केले आहे. मोदी यांच्या भाषणानंतर सगळ्यांत प्रथम नाव घेण्यात आले ते त्यांचे निकटचे सहकारी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांचे. जय शहा सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सेक्रेटरी असून या पदावर असण्यासाठी त्यांच्याकडे कोणते विशेष क्वालिफिकेशन आहे असा सवाल पंतप्रधानांना करण्यात आला आहे.
भाजपवर टीका करताना कॉंग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद म्हणाल्या की, भाजपची घराणेशाहीची विधाने अत्यंत पोकळ आहे. कारण त्यांच्या स्वत:च्या पक्षातच घराणेशाहीची मोठी यादी आहे. केवळ इतकेच नाही तर या पक्षाने इतर पक्षांतून जे नेते आयात केले आहेत तेही घराणेशाहीतलेच आहेत. घराणेशाहीबद्दल बोलताना ते पियुष गोयल, अनुराग ठाकूर आणि दुसऱ्या पक्षातून अलीकडेच भाजपमध्ये आलेले सुवेंदु अधिकारी यांच्याबद्दल का बोलत नाहीत? हे दुसरे काही नसून दुहीचे राजकारण आहे. बेरोजगारी, महागाई, दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आलेले अपयश या मुद्द्यांवरून लक्ष अन्यत्र वळवण्यासाठीच हे सगळे केले जाते आहे. मुद्दे भरपूर आहेत. मात्र आपले अपयश झाकण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून तीच जुनी टेप वाजवली जाते आहे.
भाजपमधील घराणेशाही:
हरियाणाचे माजी मुख्यंमंत्री कुलदीप बिश्नोई आणि त्यांच्या पत्नी रेणुका बिश्नोई यांनी अलिकडेच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. बिश्नोई हरियाणातील प्रस्थापित नेते आहेत. त्यांच्या पत्नीही माजी आमदार आहेत. दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करताच आपला मुलगा भव्य आमदार व्हावा अशी आपल्या मतदारसंघातील नागरिकांची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राजनाथ सिंह हे संरक्षण मंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पदही त्यांनी भूषवले आहे. त्यांचे पुत्रही नोएडा येथील आमदार व भाजपच्या प्रदेश शाखेचे उपाध्यक्ष आहेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान परिषदेचे माजी सदस्य गंगाधरपंत फडणवीस यांचे पुत्र आहेत. तर राज्यातील माजी मंत्री शोभाताई फडणवीस या दवेंद्र फडणवीस यांच्या काकू आहेत.
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या स्वत: आमदार आहेत. त्यांचे पुत्र दुष्यंत सिंह भाजपचे खासदार आहेत. भाजपमधील घराणेशाहीच्या या यादीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी केंद्रीय मंत्री आर. पी. एस सिंह, सुनील जाखर आदींचाही समावेश आहे. बसवराज यांचे पिता एस. आर. बोम्मई 1988-89 मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे देवेगौडा कुटुंबाप्रमाणे पिता- पुत्र राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे हे कर्नाटकातील आणखी एक उदाहरण.
इतर पक्षांतून आलेले मोठे नेते
आर. पी. एन सिंह हे जानेवारीत भाजपमध्ये दाखल झाले. मात्र त्यांचे पिता कुवर चंद्रप्रताप नारायण सिंह हे देखिल खासदार आणि इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री होते. कॉंग्रेसचे दिग्गज नेते जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र जितीन प्रसाद भाजपमध्ये दाखल झाले व योगी आदित्यनाथ सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. ज्योतिरादित्य शिंदे कॉंग्रेसचे दिग्गज नेते माधवराव शिंदे यांचे पुत्र. त्यांनाही भाजपने केंद्रात मंत्री केले आहे. ज्योतिरादित्य वसुंधरा राजे यांचे भाचेही आहेत.