पंजाबमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक

चंदीगड – पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा मिळाल्यावर पठाणकोट आणि गुरदासपूरमध्ये व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. अमृतसरमध्येही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. शोधमोहिमेसाठी जालंधर आणि फिल्लौर येथून तीन हजार जवानांना पाचारण करत त्यांना पठाणकोट आणि गुरदासपूर येथे पाठविण्यात आले आहे.

113 पोलीस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखाली पथकांची निर्मिती करत शोधमोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम तीन दिवस चालणार असून याअंतर्गत शहरापासून सीमेपर्यंत प्रत्येक घर तसेच जंगलात शोध घेतला जाणार आहे. पंजाब पोलिसांनी हिमाचल प्रदेश पोलिसांच्या मदतीने डमटाल येथील जंगलांमध्येही शोधमोहीम हाती घेतली आहे.

मागील चार दिवसांपासून सातत्याने फिरोजपूर सीमेवर ड्रोन दिसून येणे आणि खेमकरण येथे पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या खुलाशानंतर राज्यभरात अतिदक्षता बाळगण्यात येत आहे. पठाणकोट वायुतळ आणि अमृतसर विमानतळावर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा मिळाल्याने, या जिल्ह्यांमध्ये बटालियन्सना शस्त्र, बुलेटप्रूफ जॅकेट आणि ड्रगन लाइट्‌सची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे.

ड्रोनच्या मदतीने पाकिस्तानातून शस्त्रास्त्र आणण्याच्या गुन्ह्यात सामील 9 दहशतवाद्यांपैकी 4 जणांना एनआयएने दिल्ली येथे आणले आहे. मोहाली न्यायालयाने खलिस्तान जिंदाबाद फोरमच्या दहशतवाद्यांना 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. फिरोजपूर सीमेनजीक हुसैनीवाला तपासणी नाक्‍यावर 7-10 ऑक्‍टोबर या कालावधीत सातत्याने पाकिस्तानी ड्रोन दिसून आला होता. या घटनेनंतर सीमेवरील सतर्कता वाढविण्यात आली होती.

पाकिस्तानातून सप्टेंबर महिन्याच्या मध्यात सुमारे 8 चिनी ड्रोन्सच्या माध्यमातून 80 किलो स्फोटके पंजाब आणि जम्मू-काश्‍मीरमध्ये पाठविण्यात आली होती. पाकिस्तानी दहशतवादी संघटना पंजाब आणि जम्मू-काश्‍मीरमध्ये मोठा हल्ला घडवून आणण्याचा कट रचत आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)