श्रीनगर : जम्मू काश्मिरमध्ये दहशतावादी कारवाई करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. तरल भागात या दहशतवाद्यासोबत सलग दोन दिवस चकमक सुरू होती. त्यात एक जवान आणि एक पोलिस अधिकारी शहीद झाला होता.
जम्मू काश्मिर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबु सैफुल्ला उर्फ अबू कासीम या परकीय दहशतवाद्याला ठार करण्यात आले. हा अतिरेकी जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असे. गेल्या दीड वर्षापासून तो तरल आणि ख्रुव भागात कारवाया करत होता. परकीय दहशतवादी कारी यासीम याचा तो निकटचा साथिदार होता.
अबूशी पहिली चकमक 21 जानेवारीला उडाली होती. त्यानंतर तो पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. मात्र सुरक्षा दलांनी त्याचा पाठलाग सुरू ठेवला. अखेरीस काल त्याचा खात्मा केला.
झेनतांग गावात दहशतवादी लपल्याची खबर सुरक्षा दलांना मंगळवारी (दि. 21) मिळाली. त्यानंतर पोलिस, राष्ट्रीय रायफल्स आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी शोध मोहीम सुरु केली त्यावेळी या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. त्यात राहुल रन्सवाल हा जवान आणि शहबाझ अहमद हे अधिकारी जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेत असताना नकाबंदी केलेल्या भागातून हे दहशतवादी जंगलात पसार झाले.
सुरक्षा दलांनी त्यांचा पाठलाग केला. दहशतवाद्यांना नागनदर येथील जंगलात सुरक्षा दलांनी गाठले. तेथे त्याला कंठस्नान घालण्यात आले.