सुरक्षा दलांच्या मोहिमेत सहा नागा बंडखोरांना कंठस्नान

इटानगर : लष्कर, आसाम रायफल्स आणि अरूणाचल प्रदेश पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त मोहिमेत सहा नागा बंडखोरांना कंठस्नान घालण्यात आले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. हे बंडखोर एनएससीएन आयएम या गटाशी संबंधित होते. अरुणाचलच्या लॉंगडिंग जिल्ह्यातील नगिनू गावात शनिवारी सकाळी ही चकमक उडाली.

अरुणाचलचे पोलीस महासंचालक आर. पी. उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा ते आठ बंडखोर या भागात मोठ्या शस्त्रसाठ्यानिशी अल्याची पक्की खबर मिळाली होती. नगिनू गावातून दाट जंगलात आणि पर्वतीय क्षेत्रात तासभर गिर्यारोहण करून पथक घटनास्थळावर पोहोचले.

बंडखोरांनी तात्पुरत्या निवासस्थानासाठी उभारलेल्या निवाऱ्याचा आडोसा घेत सुरक्षा यंत्रणांवर गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलांनी प्रत्यूत्तर दिले. त्यात सहा बंडखोर ठार झाले. घटनास्थळावरून चार एके 47 रायफली, दोन चिनी एमक्‍यू 81 रायफली, दोन हातबॉम्ब एक दूरनियंत्रक, एक हजार जिवंत काडतुसे आणि 300 पुंगळ्या जप्त करण्यात आल्या.

राजकीय नेत्यांचे अपहरण करण्याचा आणि सुरक्षा दलांवर हल्ला करण्याची या बंडखोरांची योजना होती. या चकमकीनंतर या भागात आणखी काही बंडखोर असण्याची शक्‍यता लक्षात घेऊन शोध मोहीम सुरू करण्यात आली. या बंडखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. त्यात बंडखोरांच्या म्होरक्‍यांचा समावेश असण्याची शक्‍यता उपाध्याय यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.