वरवंड – पाटस (ता. दौंड) या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण 69 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या आहेत. मात्र आता मतदानाला अवघा दोन दिवसांचा अवधी राहिला असल्याने अनेक उमेदवारांनी सावध पवित्रा घेत वेगळी शक्कल लढवत वेगळ्याच पध्दतीने मतदारांना भेटण्यास सुरुवात केली आहे.
रात्री अपरात्री मतदार, मित्र, नातेवाईक, पाहुणे यांच्या भेटी घेऊन फक्त माझी एक फुली मारा बाकी कोणाला मतदान करायचे ते करा, अशी भूमिका घेतली आहे. एक-दोन दिवसांपूर्वीच पॅनलच्या उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करा, अशी भूमिका घेतलेल्या उमेदवारांनी अचानक यु-टर्न घेतल्याने मतदार अवाक झाले आहेत. मतदार उमेदवारांच्या या भूमिकेची चर्चा करीत आहेत.
पाटस हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. गावात एकूण 6 वॉर्ड आहेत आणि या सहा वॉर्डातून एकूण 17 ग्रामपंचायत सदस्य निवडून येतात. यंदा यातील 4 नंबर वॉर्डमधील 1 जागा बिनविरोध झाली आहे, तर 4 नंबर वॉर्डमधील दुसऱ्या एका जागेसाठी दोन उमेदवार उभा आहेत.
यातील एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवारास जाहीर पाठिंबा दिला आहे, यामुळे या दोन जागा वगळता इतर जागांसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. उमेदवार निवडून येण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करण्यास तयार आहेत. असे असले तरी मतदार कोणाला निवडून आणणार आणि कोणाला पडणार, हे मात्र मतमोजणीच्या दिवशीच समजणार आहे . यामुळे कोण निवडून येणार आणि कोणाची रणनीती यशस्वी ठरली आणि कोण फेल ठरणार, हे समजण्यासाठी सर्वांनाच काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
प्रचार गीतांवर भर
उमेदवारांनी गावात वॉर्डात जागोजागी फ्लेक्स लावले आहेत. उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी चारचाकी वाहनांवरील ध्वनिक्षेपकांवर कर्णकर्कश आवाजात विविध गाणी आणि प्रचार गीते लावली जात आहेत. विरोधी उमेदवार किंवा पॅनलच्या प्रचाराच्या गाडीपेक्षा आपल्या प्रचाराच्या गाडीचा जास्त आवाज कसा येईल, याकडे उमेदवार जास्त लक्ष देत आहेत. अनेक अपक्ष उमेदवारांनी तसेच पॅनलने प्रचाराच्या गाड्या लावून प्रचाराचा धुमाकूळ घातला आहे. सर्वत्र प्रचार गीतांचा आवाज ऐकू येतो आहे.
अपक्ष उमेदवारांमुळे अनपेक्षित निकालाची शक्यता
पाटस गावात अनेक अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत, यामुळे काही अपवाद वगळता प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक जागेसाठी अनेक उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अपक्ष उमेदवारांमुळे या निवडणुकीत विशेष रंगत आली असल्याचे चित्र दिसत आहे. अपक्ष उमेदवारांनी पॅनलच्या उमेदवारांप्रमाणेच प्रचार यंत्रणा लावली असून, मतदारांच्या भेटीगाठीवर भर दिला आहे. यामुळे प्रत्येक वॉर्डमध्ये जास्त चुरस पाहायला मिळत आहे. अपक्ष उमेदवार किती मते घेणार, यावर अनेक समीकरणे अवलंबून आहेत. अपक्ष उमेदवारांमुळे अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत .
———–
क्रॉस व्होटिंग होणार
उमेदवारांना निवडणुकीत काय होईल याचा फारसा अंदाज नसल्याने, काहीही झाले तरी आपल्याला निवडून यायचं आहे असा चंग अनेक उमेदवारांनी बांधला आहे. निवडून येण्यासाठी छुप्या पद्धतीने अनेक उमेदवार काम करत आहेत. नवीन समीकरणे जुळवण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. तुमच्या भागातून माझं चिन्ह चालवा, तुमचं चिन्ह आमच्या भागातून चालवू अशी छुपी युती काही उमेदवारांमध्ये झाली असल्याची चर्चा रंगू लागल्या आहेत. अनेकांच्या छुप्या गाठीभेटीमुळे अनेक ठिकाणी क्रॉस वोटिंग होणार, असल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरू आहेत .