प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 2 -शहरामध्ये ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत. त्यांना उत्कृष्ट सुविधा व तांत्रिक प्रशिक्षण मिळावे, यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून क्रीडा निकेतन शाळा सुरू केल्या आहेत. पण, अजूनही येथे कंत्राटी किंवा मानधनावर क्रीडा प्रशिक्षक बोलवावे लागत आहेत. त्यामुळे खेळाडू घडणार तरी कसे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
पुणे मनपा शिक्षण विभागाने शहरामध्ये तीन अनिवासी क्रीडा निकेतन सुरू केल्या आहेत. या शाळांमध्ये सुमारे 500 विद्यार्थी शिकतात. या विद्यार्थ्यांना मोफत नाष्टा, जेवण, दूध, फळे उपलब्ध करुन दिली जातात. या शाळांमध्ये उत्तम दर्जाचे प्रशिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका मानधनावर क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करते. पण, अनेक वर्षे लोटली तरी या क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. या शाळांसाठी नियमानुसार 25 ते 30 क्रीडा शिक्षकांची गरज आहे.
क्रीडा धोरण कागदावरच
महापालिकेने सन 2013 मध्ये क्रीडा धोरण जाहीर केले होते. एखाद्या शहराचे स्वतंत्र क्रीडा धोरण जाहीर करणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली होती. त्यावेळी पुण्याचे खूप कौतुकही झाले. पण, प्रत्यक्षात हे क्रीडा धोरण केवळ कागदावर राहिल्याचे दिसून येत आहे.
मनविसेचे निवेदन
क्रीडानिकेतन शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची तातडीने नियुक्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेवे वडगावशेरी विभागाध्यक्ष कुलदीप घोडके, सांस्कृतिक सचिव अशोक पवार यांनी पुणे महापालिका आयुक्त, शिक्षण आयुक्तांना दिला आहे.
कोठे आहेत क्रीडानिकेतन शाळा
सिंहगड रस्ता : खाशाबा जाधव अनिवासी क्रीडा निकेतन
हडपसर : भारतरत्न सचिन तेंडूलकर क्रीडा निकेतन
येरवडा : क्रीडा निकेतन शाळा