पुणे – केंद्र शासनाच्या समग्र शिक्षण अभियानांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण योजनेस 24 कोटी 91 लाख 33 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या वितरणाची कार्यवाही करण्यात येणार आहे.
राज्यातील यंदाची करोना परिस्थिती विचारात घेऊन 2020-21 या वर्षाच्या अनिवार्य व कार्यक्रम खर्चाच्या एकूण वार्षिक अर्थसंकल्पित तरतूदीच्या 15 ते 25 टक्क्यांच्या मर्यादेत निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली.
प्राथमिक शिक्षणासाठी 24 कोटी 61 लाख 51 हजार रुपये, तर माध्यमिक शिक्षणासाठी 29 लाख 81 हजार 666 रुपये याप्रमाणे निधी वितरित होणार आहे. प्रशासकीय विभाग प्रमुख शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांना अर्थसंकल्पिय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यास मान्यता प्रदान केली आहे.
करोनामुळे पुढील 3 ते 4 महिने राज्याची आर्थिक स्थिती गंभीर स्वरुपाची असण्याची शक्यता असल्याने वितरीत निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा.
सध्याच्या शासकीय धोरणास अनुसूरन मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी लागणार आहे, असे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे कार्यासन अधिकारी प्रशांत वाघ यांनी जारी केले आहेत.