एचपी ड्रिम वन संघाचा सलग दुसरा विजय

एचपी ड्रिम वन महिला प्रिमियर लीग अजिंक्‍यपद क्रिकेट स्पर्धा : पीएमपी संघाने विजयाचे खाते उघडले 

पुणे – डिव्हाईन स्टार तर्फे आयोजित चौथ्या “एचपी ड्रिम वन महिला प्रिमियर लीग (डब्ल्युपीएल)’ अजिंक्‍यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत एचपी ड्रिम वन या संघाने आपला विजयीरथ कायम ठेवत सलग दुसरा विजय नोंदविला. पीएमपी ग्रुप संघाने प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयाचे खाते उघडले.

व्हिजन क्रिकेट ऍकॅडमी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत श्‍वेता खटाळ हिच्या चमकदार गोलंदाजीच्या जोरावर पीएमपी ग्रुपने ऑक्‍सिरीच स्मॅशर्सचा 67 धावांनी पराभव करून पहिला विजय मिळवला. पहिल्या दिवशी झालेल्या पराभवातून धडा घेत संघाने आज चांगली कामगिरी केली. पीएमपी संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमावून 148 धावा केल्या. ऋतुजा गिलबीले (31 धावा), उत्कर्षा पवार (31) आणि तेजश्री ननावरे (25) यांच्या फलंदाजीमुळे संघाने समाधानकारक धावसंख्या उभी केली.

या आव्हानाचा पाठलाग करताना ऑक्‍सिरीच स्मॅशर्स संघाची फलंदाजी काही मनासारखी झाली नाही. ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत राहीले व त्यांचा डाव 19.5 षटकात व 81 धावांवर संपुष्टात आला. साक्षी कानडी (14) व मानसी बोर्डे (12) या दोघीं व्यतिरिक्त खेळपट्टीवर कोणीही टिकाव धरू शकले नाही. श्‍वेता खटाळ हिने 18 धावात 3 तर, किरण नवगिरे हिने 6 धावात 2 गडी बाद करून विजयात महत्वाची भुमिका बजावली.

अष्टपैलू खेळाडू पुनम खेमनार हिच्या कामगिरीच्या जोरावर एचपी ड्रिम वन संघाने ऍडोर मारव्हलस्‌ संघाचा 40 धावांनी पराभव करून स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. एचपी संघाने स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशी ऑक्‍सीरिच संघाचा पराभव केला होता.

एचपी संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनम खेमनार (42 धावा), चारमय गवई (23 धावा) आणि गौतमी नाईक (20) या खेळाडूंच्या कामगिरीमुळे 20 षटकात 6 गडी गमावून 101 धावा जमविल्या. ऍडोर मारव्हलस्‌ संघाला हे आव्हान गाठता आले नाही व त्यांचा डाव 16.1 षटकात 61 धावांवर संपुष्टात आला. पुनम खेमनार हिने 13 धावात 4 गडी तर, सायली लोणकर हिने 6 धावात 2 गडी टिपत संघाचा विजय सुकर केला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×