दुसऱ्या लाटेचा रोजगारावरही प्रकोप! महिन्यात 75 लाखांहून अधिक लोक बेरोजगार

मुंबई – करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला सर्वाधिक फटका बसला आहे. विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यसरकारांनी नाईलाजाने स्थानिक लॉक डाऊन सारखे पर्याय अवलंबले असून यामुळे रुग्णसंख्या थोड्या प्रमाणात का होईना पण कमी होताना दिसतीये.

एकीकडे विषाणूला रोखण्यासाठी कडक निर्बंध आवश्यक असले तरी यामुळे अर्थचक्राला मात्र पुन्हा एकदा खीळ बसली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार लॉक डाऊन व तत्सम निर्बंधांमुळे देशातील 75 लाख नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. यामुळे देशाचा बेरोजगारी दर गेल्या चार महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर असून हे प्रमाण सध्या 8 टक्के इतके आहे.

याबाबत बोलताना सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी, येणाऱ्या काळात देशातील रोजगाराबाबतची परिस्थिती आव्हानात्मक राहील असा अंदाज वर्तवला. ‘मार्चच्या तुलनेत आपण एप्रिल महिन्यात 75 लाख रोजगार गमावले. यामुळेच बेरोजगारीचा दर वाढला.

दरम्यान, केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार देशातील बेरोजगारीचा दर 7.97 टक्के इतका झाला आहे. शहरी भागांमध्ये 9.78 तर ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी दर 7.13 टक्के इतका आहे. यापूर्वी मार्च माहियामध्ये देशाचा बेरोजगारी दर 6.50 टक्के इतका होता.

देशातील वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी लॉक डाऊन अथवा तत्सम निर्बंध लादले आहेत. याचा प्रतिकूल परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असल्याने बेरोजगारीचा आलेख देखील वधारला आहे.

दरम्यान, व्यास यांनी वाढत्या बेरोजगारी दराबाबत पुढे बोलताना, सध्याची परिस्थिती पहिल्या लॉक डाऊन एवढी घसरली नसल्याचेही स्पष्ट केले. त्यावेळी बेरोजगारीचा दर 24 टाक्यांवर जाऊन पोहचला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.