जेनेव्हा – इस्त्रायलने शुक्रवारी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा लॉकडाउन जाहीर केले आहे. हे लॉकडाउन तीन आठवड्यांसाठी असणार आहे. नागरिकांना घरापासून 1 किमीपेक्षा जास्त अंतरावर जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.
करोनाचा उगम झाल्यानंतर दुसऱ्यांदा लॉकडाउन जाहीर करणारा इस्त्रायल हा जगातील पहिलाच देश आहे. दरम्यान, करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनीही करोनाची दुसरी लाट येत असल्याचा इशारा दिला असून किमान सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले जाण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. दुसरी लाट येणार हे निश्चित असल्याचे नमूद करून ते म्हणाले दुसऱ्या लाटेच्या संदर्भात ब्रिटन स्पेन आणि फ्रान्सपेक्षा सहा महिने मागे आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्त केली आहे. मार्च महिन्यात जेव्हा करोनाचे सर्वोच्च रूग्ण सापडले होते, त्यापेक्षा वेगाने आता रूग्णांची संख्या वाढते आहे. गेल्या आठवडाभरातच युरोपातील रूग्णांची संख्या तीन लाखांच्या वर गेली असल्याची माहिती संघटनेने दिली.
युरोपातील निम्मे देशांत गेल्या आठवड्यात दहा टक्के रूग्ण वाढले आहेत, तर 7 देशांमध्ये आठवडाभरात रूग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. जगभरात आतापर्यंत करोनाने साडेनउ लाख जणांचा बळी घेतला आहे.