कृषी पदविकेच्या दुसऱ्या, तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा रद्द

पुणे(प्रतिनिधी)  – करोनाच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी पदविकेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या जुलै महिन्यात होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातील 230 संस्थेच्या दहा हजार विद्यार्थ्यांना हा नियम लागू होणार आहे. कृषी मंत्री दादाजी भुसे आणि राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांच्या उपस्थितीत कृषी परिषदेच्या झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे.

तिसऱ्या वर्षाच्या मुलाला पाठीमागील दोन वर्षाच्या गुणांच्या सरासरीनुसार, तर दुसऱ्या वर्षाच्या मुलाला पहिल्या वर्षाच्या गुणांच्या आणि अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षांचा विचार करून गुण देण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती राज्यमंत्री डॉ.विश्‍वजित कदम यांनी दिली.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात कृषी व्यवस्थापन आणि भंडारा जिल्ह्यात कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. दरम्यान राज्यात सोयाबीन शेतकऱ्यांची अनेक ठिकाणी फसवणूक झाली आहे. कंपन्यानी दिलेले वाणाची लागवड करण्यात आली. मात्र, ते उगवलेच नाही. या पार्श्‍वभूमीवर अशा कंपन्यांवर स्थानिक पातळीवर कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे 22 कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती कदम यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांना पिक कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करण्यात येत असून, जुलै महिन्यात 50 ते 70 टक्के शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.