‘आरटीई’ प्रवेशाची दुसरी फेरी : 10 हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्‍चित

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्‍क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्‍के प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत सात दिवसांत केवळ 10 हजार विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. पाहिजे ती शाळा प्रवेशासाठी न मिळाल्यामुळे प्रवेशाकडे पालकांकडून पाठ फिरविली आहे.

“आरटीई’ अंतर्गत विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्यात येते. राज्यात 9 हजार 195 शाळांमध्ये एकूण 1 लाख 16 हजार 793 प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आल्या आहेत. या जागांसाठी 2 लाख 45 हजार 499 ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 8 एप्रिल रोजी प्रवेशासाठी पहिली राज्यस्तरीय लॉटरी काढण्यात आली होती. या लॉटरीद्वारे 67 हजार 716 जागा प्रवेशासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यातील 47 हजार 35 जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. पहिल्या फेरीतील 20 हजार 681 प्रवेशाच्या जागा रिक्त आहेत.
त्यानंतर 15 जून रोजी एनआयसीमार्फत “आरटीई’ पोर्टलवरील डेटा रन करून प्रवेशासाठी दुसरी राज्यस्तरीय लॉटरी काढण्यात आली आहे. या लॉटरीत 35 हजार 276 विद्यार्थ्यांचा नंबर लागला आहे. लॉटरी लागलेल्या पालकांना

“एसएमएस’ही पाठविण्यात आले आहेत. 17 जूनपासून यांना प्रवेश घेण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पडताळणी समितीकडे कागदपत्रांची तपासणी करून शाळेत प्रवेश घेण्यासाठी यांना 27 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात 963 शाळांमध्ये 5 हजार 495 प्रवेशाच्या जागा दुसऱ्या लॉटरीद्वारे उपलब्ध झाल्या आहेत.

घराजवळची हवी ती शाळा न मिळाल्यामुळे पालकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. बहुसंख्य पालकांनी अद्याप पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची तपासणीच करून घेतलेली नाही. लॉटरी लागूनही शाळांमध्ये प्रवेशासाठी पालक जात नसल्याचे स्पष्ट होऊ लागले.

Leave A Reply

Your email address will not be published.