दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना; विंडीजचा बांगलादेशवर रोमांचकारी विजय

एकदिवसीय मालिकेत बरोबरी

गयाना: बांगलादेशला अखेरच्या षटकांत 8 धावांची गरज असताना वेस्टइंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने केवळ 4 धावांच देत 3 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने शिमरॉन हेथमायरच्या फटकेबाजीच्या जोरावर 49.3 षटकांत सर्वबाद 271 धावांपर्यंत मजल मारली. विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य घेऊन प्रत्युत्तरात फलंदाजी करताना बांगलादेशला निर्धारित 50 षटकांत 6 बाद 268 धावांचीच मजल मारता आल्याने त्यांना तीन धावांनी निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले.

विजयासाठी 272 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने वेगवान सुरुवात केली. मात्र, तिसऱ्याच षटकांत वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात असलेला ऍनामुल हक 9 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 23 धावा करुन परतला. त्यानंतर तमिम इक्‍बाल आणि शकिब अल हसनयांनी सावधपणे फलंदाजी करताना संघाला शंभरी पार करून दिली. आपले अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तमिम इक्‍बालला बाद करत विंडीजने बांगला देशला दुसरा धक्‍का दिला. तमिम आणि शकीब यांनी 22.3 षटकांत 97 धावांची भागीदारी केली. यावेळी तमिमने 85 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. तर शकिबदेखील लागलीच परतल्याने बांगलादेशला तिसरा धक्‍का बसला. शकिबने 72 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 56 धावांची खेळी केली.

लागोपाठ दोन धक्‍के बसल्यानंतर मुश्‍फिकुर रहीम आणि महमुदुल्लाह या दोघांनीही चेंडूमागे धाव अशी धावगती ठेवत बांगला देशला दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. मुश्‍फिकुर आणि महमदुल्लाह यांनी 15.5 षटकांत 87 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला विजयाच्या समीप नेले. मात्र दोघेही लागोपाठ परतल्याने बांगलादेश संघ अडचणीत सापडला. यावेली महमुदुल्लाहने 39 धावांची खेळी केली तर मुश्‍फिकुरने 67 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने 68 धावांची खेळी केली. दोघेही बाद झाल्यानंतर शब्बीर रेहमान देखील लागलीच परतला. तर मोसद्देक हुसेन आणि मशर्रफ मोर्तझा यांना अखेरच्या षटकांत 8 धावा करता न आल्याने बांगलादेशला 3 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडीजची सुरुवात खराब झाली. सलामीवीर एविन लुईस केवळ 12 धावा करुन परतल्याने लवकरच त्यांना पहिला झटका बसला. तर शाय होप (25) आणि ख्रिस गेल (29) हेही लवकर परतल्याने त्यांची 18.4 षटकांत 3 बाद 77 अशी घसरगुंडी उडाली होती. तसेच त्यानंतर आलेला जेसन मोहम्मद देखील 12 धावा करुन परतल्याने पुन्हा एकदा वेस्ट इंडिजचा संघ अडचणीत सापडला होता.
त्यानंतर शिमरॉन हेथमायर आणि रोवमन पॉवेल यांनी सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेऊन संघाला द्विशतकाचा टप्पा गाठून दिला. या दोघांनी 18.2 षटकांत 103 धावांची भागीदारी केली. रोवमन पॉवेलने 44 धावांची खेळी केली. त्यानंतर विंडीजचे बाकी फलंदाज नांगी टाकत असताना हेथमायरने 93 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 125 धावांची खेळी करताना संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)