विजयकुमार कुलकर्णी
पुणे – प्रेम विवाहानंतर सहा वर्ष संसार केला. त्यानंतर दोघांनी वेगळे होत परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. त्यानंतर आलेल्या एकटेपणा, वय, परिस्थितीचा विचार करून पुन्हा दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. नुकताच या जोडप्याने विवाह करून नव्याने सेकंड इनिंग सुरू केली आहे.
माधव (४०) आणि माधवी (वय ३८) (नाव बदलले आहे) अशी दोघांची नावे आहेत. दोघांतर्फे ॲड. प्रणयकुमार लंजिले, ॲड. अनिकेत डांगे आणि ॲड. लक्ष्मण सावंत यांनी काम पाहिले. दोघेही मूळचे परराज्यातील असून नोकरी करतात. एकमेकांच्या संपर्कात आल्याने दोघांचे प्रेम झाले. यातून दोघांनी २०१६ मध्ये विवाह केला. काही दिवस संसार सुरळीत सुरू होता.
मात्र, माधवला मद्याचे व्यसन होते. यातून तो तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊ लागला. तिचे सोन्याचे दागिने विकले. दोघात वाद विकोलापाला गेले. तिने कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार दावाही दाखल केला. नंतर २०२२ मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. दोघांना अपत्य नव्हते. त्यानंतर वर्षभर ते वेगळे राहिले. मात्र, काही कारणाने पुन्हा संपर्कात आले आणि बोलू लागले.
यातून दोघांना एकटेपणा जाणवत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वकिलांशी संपर्क साधला आणि घटस्फोटानंतर पुन्हा विवाह करता येत असल्याचा सल्ला ॲड. प्रणयकुमार लंजिले यांनी दिला. या सल्ल्याने दोघांनी पुन्हा एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. जुलै महिन्यात ते पुन्हा विवाहबध्द झाले आहेत. दोघांनी नव्याने इनिंग सुरू केली आहे. यामुळे दोघांना जीवनभराचा आधार मिळणार आहे.
“दोघांना एकटेपणा जाणवत होता. एकमेकांचे वय, नवीन जोडीदार शोधण्यापेक्षा पूर्वीच्या जोडीदारासोबत राहण्यास पसंती दिली. पुन्हा लग्न करून नवीन इनिंग सुरू केली.” – ॲड. प्रणयकुमार लंजिले, पती-पत्नीचे वकील.