SEBI Proposes Algo Trading New Rules: प्रगत तंत्रज्ञानाचा परिणाम शेअर मार्केटवर देखील पाहायला मिळत आहे. गुंतवणुकीसाठी देखील आता तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. सध्या शेअर मार्केटमध्ये अल्गो ट्रेडिंग हा शब्द चर्चेत आहे. याद्वारे गुंतवणुकीची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. अल्गो ट्रेडिंग नक्की काय आहे व याचा गुंतवणुकदारांवर काय परिणाम होऊ शकतो? याविषयी जाणून घेऊया.
अल्गो ट्रेडिंग (Algo Trading) म्हणजे काय?
अल्गो ट्रेडिंग गुंतवणुकदारांसाठी फायदेशीर ठरणार आहे. यामध्ये कॉम्प्युटरच्या मदतीने ऑटोमेटेड ट्रेडिंग केले जाते. यासाठी आधी कॉम्प्युटर्सला प्रोग्राम्ड केले जाते. कॉम्प्युटर्सला व्यवहार पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षण व निर्देश दिले जातात. कॉम्प्युटर्स या निर्देशांचे पालन करून अवघ्या काही सेकंदात असंख्य व्यवहार पूर्ण करू शकतात. याद्वारे नुकसान कमी होण्याची देखील शक्यता निर्माण होते.
अल्गो ट्रेडिंगविषयी सेबीचा नवीन नियम काय?
SEBI ने Algorithmic Trading साठी नवीन ड्राफ्ट जारी केला आहे. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना अल्गो ट्रेडिंग वापरण्यासाठी मंजूरी देण्याचा विचार आहे. एक्सचेंज आणि ब्रोकर्सद्वारे आता किरकोळ गुंतवणुकदारांसाठी API, Algos उपलब्ध केले जाऊ शकतात. यामुळे आता किरकोळ गुंतवणुकदारांना देखील अल्गोच्या मदतीने व्यवहार करणे शक्य होईल. सेबीने अल्गो ट्रेडिंगबाबत मते मागवली आहेत.
किरकोळ गुंतवणुकदारांना होणार फायदा
गेल्याकाही वर्षात भारतात किरकोळ गुंतवणुकदारांची संख्या वाढली आहे. सेबीकडून देखील अशा गुंतवणुकदारांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याचाच पुढील टप्पा अल्गोरिद्म ट्रेडिंग आहे. सेबीने या ड्राफ्टविषयी 3 जानेवारीपर्यंत मते मागवली आहेत. तसेच, किरकोळ गुंतवणुकदारांना अल्गो ट्रेडिंग उपलब्ध करण्यामध्ये स्टॉक ब्रोकर्सची महत्त्वाची भूमिका असेल. ब्रोकर्स एक्सचेंजच्या परवानगीनंतर गुंतवणुकदारांसाठी अल्गो उपलब्ध करून देईल.
अल्गो ट्रेडिंगच्या मदतीने सेकंदात व्यवहार पूर्ण करणे शक्य असल्याने नफ्याची संधी अधिक वाढते. तसेच, याद्वारे शेअर खरेदी-विक्रीचे व्यवहार अधिक सुरळीतपणे पार पडतात. मात्र, या प्रकारची ट्रेडिंगमध्ये खबरदारी घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे.