नवी दिल्ली – शेअर बाजार नियंत्रक सेबीने फ्युचर रिटेल समूहाचे प्रमुख किशोर बियाणी यांच्यासह काही जणावर इनसायडर ट्रेडींगमुळे शेअर बाजारातील व्यवहार करण्यासाठी एक वर्षाची बंदी घातली आहे. फ्युचर समूहाने या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र सेबीने घेतलेल्या या निर्णयाचा फ्युचर समूह आणि रिलायन्स इंडस्ट्रीज दरम्यान झालेल्या व्यवहारावर कसलाही परिणाम होणार नसल्याचा दावा फ्युचर समूहाने केला आहे. इन्सायडर ट्रेडिंगमध्ये भाग घेतल्याबद्दल किशोर बियाणी आणि फ्युचर रिटेल समुहातील इतर काही व्यक्तींना एक वर्षासाठी शेअर बाजाराचे व्यवहार करता येणार नाहीत असे सेबीने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
किशोर बियाणी आणि अनिल बिर्याणी यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे. फ्युचर समूहाने आपल्या समूहातील बहुतांशी भाग रिलायन्स इंडस्ट्रीजला 24, 713 कोटी रुपयांना विकला आहे. ऍमेझॉन कंपनीने या व्यवहाराला आव्हान दिले आहे. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात आहे.
दरम्यान याअगोदर दिल्ली उच्च न्यायालयाने फ्युचर समूह आणि रिलायन्स दरम्यान झालेल्या व्यवहाराला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर फ्युचर समूहाने या संबंधात याचिका दाखल केली आहे.
वृत संस्थांनी याबाबत ऍमेझॉन समूहाकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. फ्युचर समूह आणि रिलायन्सदरम्यान झालेल्या व्यवहाराला ऍमेझॉन कंपनीने हरकत घेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय लवादामध्ये निर्णय अमेझॉन कंपनीच्या बाजूने लागलेला आहे. मात्र याला फ्युचर समहाकडून भारतीय न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे.
दरम्यानच्या काळामध्ये या व्यवहाराला बाजार नियंत्रक सेबीने परवानगी दिलेली आहे. उच्च न्यायालयाने फ्युचर समूह आणि रिलायन्स दरम्यानच्या व्यवहाराला स्थगिती दिल्यानंतर आता फ्युचर समूह कायदेशीर प्रक्रिया करण्याच्या विचारात असल्याचे कंपनीने म्हटले आहे.