एसईबीसी, ईडब्ल्यूसी आरक्षण वगळले

शिक्षक पात्रता फेरी : उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून अर्ज सादर करण्याच्या सूचना : विद्यार्थ्यांमध्ये संताप

पिंपरी – मराठा समाजाचे आरक्षण जाहिर होवूनही अनेक ठिकाणी संभ्रम निर्माण झाले आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अद्याप मराठा समाजाचे आरक्षण मान्य केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आरक्षण मान्यच नसल्याने मराठा समाजातील उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज करावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे, विद्यार्थ्यांमधून मोठा संताप व्यक्त होत असून तातडीने एसईबीसी आणि ईडब्ल्यूसीची सवलत द्यावी, अशी मागणी होत आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2019-2020 साठी आवेदनपत्र स्विकारले जात आहेत. परंतू या आवेदन पत्रामध्ये एसईबीसी, आणि ईडब्ल्यूसी आरक्षण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पर्यायच उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही. त्यामुळे, त्यांना खुल्या प्रवर्गातून अर्ज सादर करावे लागत आहेत. याबाबत पात्रता परीक्षेच्या वेबसाईटवरही तशा सूचना केलेल्या आहेत. तर शिक्षण विभाग मात्र शासन निर्णयच आलेला नसल्याचे सांगून जबाबदारी झटकत आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने 5 डिसेंबर 2018, दि.19 डिसेंबर 2018 व 4 जुलै 2019 रोजी शासन निर्णय काढून ईबीसी आरक्षणाचा भरती प्रक्रीयेत समावेश करण्याबाबत सर्व विभागांना निर्देश दिले आहेत. असे असतानाही सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असलेल्या राज्य शिक्षक पात्रता परीक्षेच्या ऑनलाईन आवेदन पत्रात एसईबीसी आणि ईडब्ल्यूसी आरक्षणाचा पर्यायच उपलब्ध नाही. संबधित विद्यार्थ्यांनी राजभवन कार्यालयात त्यांचे प्रधान सचिव संतोष कुमार, उपसचिव उज्ज्वला दांडेकर, अवर सचिव प्रताप लुबाळ यांना मेल करुन याबाबत माहिती कळवली होती. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नसल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. आता आज नविन सरकारचा शपथविधी झाल्यानंतर तरी या विद्यार्थ्यांचा हा प्रश्‍न मार्गी लागणार का? हे पहावे लागणार आहे.

आठ गुणांचा फरक
खुल्या प्रवर्गातून विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 90 गुण इतर प्रवर्गासाठी 82 गुण आवश्‍यक आहेत. म्हणजेच एसईबीसी प्रवर्गासाठी 82 गुण मिळाले तरी तो विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहे. पंरतु हा प्रवर्गच परीक्षेच्या आवेदन पत्रामध्ये नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आठ गुणांचा फरक पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

मराठा समाजाला आरक्षण दिल्याचे जाहीर केल्यानंतर पुन्हा अशा प्रकारे समाजाला डावलण्यात येत असल्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत, शासन पातळीवर आम्ही पाठपुरावा केल्यानंतरही कोणत्याच प्रकारची दाद मिळत नसल्यामुळे आम्ही हतबल झालो आहेत. आरक्षणाचा निर्णय लागू केल्यानंतरही सवलत मिळणार नसेल तर ही समाजाची फसवणूक आहे.
– सागर गायकवाड, उमेदवार

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.