शोध

रोजच्याप्रमाणे अपडाऊनच्या चक्रात स्वत:ला टाकण्यासाठी एका विशिष्ट ठिकाणी उभा होतो. स्टॅंडमधून बस निघाली की शहराच्या बाहेर पडेपर्यंत प्रवासी घेण्यासाठी ठिकठिकाणी असणाऱ्या ज्या थांब्यावर थांबत असे, त्यातल्या एका थांब्यावर मी थांबलो होतो. नेहमीची बस चुकल्याचं एव्हाना लक्षात आलं होतं. कारण बरोबर रोज असणाऱ्या प्रवाशांपैकी कोणीही दिसत नव्हतं. खरं तर घरातून बाहेर पडतानाच उशीर झाल्यासारखा वाटत होता. मनात त्या थांब्याजवळ पोहोचेपर्यंत धाकधूक होती. तिथे पोहोचलो आणि मनातली धाकधूक खरी ठरली. ठरलेली बस चुकल्यामुळे आता पुढची बस एका तासाने होती. एक तासासाठी घरी परतणंही शक्‍य नव्हतं आणि तेथे थांबणंही कंटाळवाणं होतं. पण तेथे थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. मग भोवतीच्या वातावरणाचा विचार करू लागलो.

अवतीभोवती बघू लागलो माणसं दिसत होती. वेगवेगळी वाहनं दिसत होती. कोणी घाईगर्दीत होते, कोणी रमतगमत चालले होते. बसची वाट बघणाऱ्यांमध्येही कोणी पेपर वाचत होते, कोणी दुसऱ्याच्या पेपरमध्ये डोकावत होते. कोणी बस येत नसल्याने अस्वस्थ होते, कोणी चोरून शेजारी उभ्या असणाऱ्या बायकांच्या घोळक्‍याकडे बघत होते. कोणाचा उद्देश काही, कोणाचा काही. माझ्या मनात अस्वस्थता होती, पण हळूहळू त्या सगळ्या भोवतालचा मी एक घटक बनलो आणि येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनाच्या वेगाशी एकरूप झालो.

बराच वेळ गेला आणि एकदम जोरात कुठल्यातरी वाहनाचा ब्रेक लागल्याचा आवाज झाला. भानावर आलो तर समोर पोलिसांची व्हॅन उभी होती आणि तिच्यापुढे एक केस पिंजारलेली, अस्ताव्यस्त कपड्यातली भिकारीण खाली वाकून काहीतरी बघत होती. व्हॅनमधले दोन पोलीस खाली उतरून पुढे येईपर्यंत ही मध्यमवयीन बाई अजून वाकली आणि पुढच्या चाकाच्या वर असणाऱ्या मडगार्डखाली काहीतरी शोधू लागली. एव्हाना व्हॅनच्या पाठीशी दहा-वीस गाड्या थांबल्या. वाहतुकीचा खोळंबा झाला. बघ्यांची गर्दी झाली. उतरलेले पोलीस पुढे सरसावले, त्यांनी त्या बाईला बाजूला केले. ती वेडेवाकडे हात करीत आभाळाकडे पाहात रस्ता ओलांडत पलीकडे गेली आणि चार दोन मिनिटांत लुप्त झाली. थांबलेली वाहतूक थोड्या वेळात पूर्ववत झाली. एवढ्या सगळ्या घटनाक्रमात माझ्या बसचा वेळ झाला. बस आली आणि मी रवाना झालो.

या घटनेला महिना-पंधरा दिवस उलटले असतील तो एक दिवस पुन्हा एकदा माझी नेहमीची बस चुकली. आता तासाभराची निश्‍चिंती झाल्याची खात्री पटल्यावर मी एक वर्तमानपत्र खरेदी केलं. सगळ्या प्रवाशांच्या पाठीमागे जाऊन उभा राहिलो आणि शांतपणे वाचण्यास सुरुवात केली. वाचण्यात गती आली. मी वर्तमानपत्रात स्वत:ला हरवून बसलो आणि एकदम मोठ्याने ब्रेक दाबल्याचा आवाज झाला. भर्रकन्‌ नजर समोर गेली. माझ्या पुढच्या घोळक्‍यामुळे लवकर काय झालं दिसलं नाही. पण जेव्हा थोडा पुढे झालो तेव्हा पोलीस व्हॅन उभी होती आणि तीच ती केस पिंजारलेली महिला पुढच्या चाकाजवळ काहीतरी बघत उभी होती.

पुन्हा दहा-वीस वाहनांची रांग लागली. दोन-तीन पोलीस व्हॅनमधून उतरले आणि त्या बाईला त्यांनी बाजूला केलं. ती मागच्या वेळेप्रमाणेच आभाळाकडे वेडेवाकडे हात करीत रस्ता ओलांडून गर्दीत सामावून गेली. मला मात्र या साऱ्या घटनाक्रमाचे विलक्षण आश्‍चर्य वाटले. एकदा नव्हे तर दोनदा तशाच प्रकारची घटना घडावी हे जरा विचित्रच होते. माझ्या शेजारी उभ्या असलेल्या माणसाजवळ मी आश्‍चर्य व्यक्‍त केले. तोच त्याच्या बाजूला असणारा एक इसम माझ्या पुढ्यात आला आणि म्हणाला, “यात आश्‍चर्य वगैरे काही नाही. मला या पाठीमागचं कारण माहिती आहे.’

मी त्याच्याकडे प्रश्‍नार्थक चेहऱ्याने पाहिलं, तसा तो सांगू लागला. “मी पोलीस डिपार्टमेंटमध्येच सर्व्हिसला आहे. दोन वर्षांपूर्वी एक पोलीस व्हॅन चालली होती. त्या व्हॅनचा ताबा सुटला आणि मोठा अपघात झाला. ही बाई आणि हिची मुलगी दोघी रस्त्याने जात असताना व्हॅनच्या पुढच्या बाजूचा धक्‍का मुलीला लागला आणि मुलगी त्या धक्‍क्‍याने वारली. त्याचा परिणाम होऊन ही बाई वेडीपिशी झाली. रस्त्यावर फिरू लागली. फिरताना पोलीसची व्हॅन तिला दिसली की त्या व्हॅनसमोर कुठलाही विचार न करता ही बाई आडवी होते आणि पुढच्या चाकाखाली मुलीला शोधायला लागते.’

“अरे बापरे’ “हो, आणि हे सगळ्या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे कोणीही त्या बाईला हटकत नाही. शक्‍यतो प्रेमाने, हात धरून तिला बाजूला करतात, मग काहीतरी विचित्र हातवारे करीत ती बाजूला होते.’ “फारच विलक्षण आहे हे’ मी म्हणालो. “आहे खरं’ तो अजून काही बोलेल असं वाटत असतानाच माझी बस आली आणि मी नेहमीप्रमाणे मार्गस्थ झालो, पण डोक्‍यातले विचार गेले नाहीत. आजही पोलीसची व्हॅन दिसली की ती बाई, तिची न बघितलेली मुलगी आणि तो अपघात असं सारं डोळ्यांसमोर तरळू लागतं.

डॉ. विनोद गोरवाडकर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.