माळ्यावरच्या छत्रीचा शोध

गेले काही दिवस तापमान फारच वाढले होते. माझी मुलगी म्हणाली, आई, या वर्षी उन्हाळा जास्तच कडक आहे, पाऊस लवकर लागणार बध. छत्र्या आत्ताच शोधून ठेव. नाहीतर म्हणशील आणा नव्या. मग पप्पा बसतील ओरडत, की तुम्हाला दरवर्षी नवीन छत्री पाहिजे. त्यांची बोलणी खाण्यापेक्षा छत्र्या शोधलेल्या बऱ्या. आणि ताड्या वगैरे मोडलेल्या असल्या तर दुरुस्त करून घेतलेल्या चांगल्या. नाहीतर आयत्या वेळी व्हायची फजिती.

तिचे म्हणणे बरोबर होते. आता मे महिना संपून जून सुरू झाला होता. तरी एक बरे की या वर्षी मे महिन्यात पाऊस पडला नाही. नाही तर अगोदरच माळ्यावर चढून छत्र्या काढाव्या लागल्या असत्या. प्राचीचे म्हणणे बरोबर होते, कारण पप्पा रागावले तरी कोणतीही वस्तू घेताना काटकसर करत नाहीत. छत्र्यासुद्धा चायनीज वगैरे नको म्हणतात. उगाच शंभर-सव्वाशे रुपयांची छत्री आणायची आणि तिची काही गॅरंटी नाही. कधी तुटेल याचा भरोसा नाही. परत चायनीज छत्री म्हणजे वापरा आणि फेकून द्या. ताडी तुटली तरी कोणी दुरुस्त करून घेत नाही. एक तर आता छत्री दुरुस्त करणारे दिसत नाहीत. आणि छत्रीची ताडी बदलायची म्हटली तरी 70-80 रुपये सांगतात. परत आमच्या मुलींना रेनकोट वापरायला नकोत. छत्रीच पाहिजे. खरं तर रेनकोट किंवा त्यांच्या भाषेत आता रेनसूट वापरायला कितीतरी सोयीचा. पण त्यांना तो नको. कारण सांभाळायचा त्रास! गेल्या वर्षी पप्पांनी तिघीना तीन छत्र्या आणल्या तर बारातेराशे रुपये खर्च केले. आणि आणल्यावर समोर बिल आपटून म्हणाले, कमीत कमी दोन वर्षे तरी वापरल्या पाहिजेत. हरवल्या तर भिजत कॉलेजात जावे लागेल.

हे सारे आठवूनच प्राचीने छत्र्या शोधायची सावधगिरीची सूचना दिली होती. आता माळ्यावर मलाच चढणे भाग होते. आणली शिडी, लावली आणि चढली माळ्यावर. मनात म्हटले, आता इतर काहीही बघायचे नाही. अर्जुनाला पोपटाचा डोळा दिसत होता ना, त्या गोष्टीत, तशा आपल्याला फक्त छत्र्याच दिसल्या पाहिजेत माळ्यावर. माळ्यावर चढून मस्तपैकी बैठक मारली आणि छत्र्या शोधायच्या म्हणून चौफेर एक नजर टाकली.

आणि “सेनयोरुभयोमध्ये रथ स्थापय मे अच्युत म्हणणाऱ्या अर्जुनाची जशी महाभारत युद्धात स्थिती झाली होती, तशी माझी झाली. विविध वस्तूंचे डोंगरच्या डोंगर झाले होते, माळ्यावर. ते ही धुऴीने भरलेले. आता चौथ्या मजल्यावरच्या माळ्यावर इतकी धूळ कोठून येते हे एक कोडेच आहे, न सुटलेले. आता त्या धुळीने भरलेल्या ढिगाऱ्यात हात घालायचा म्हणजे संकटच. पण तरीही मी पुढे झाले.

त्या ढिगात काय नव्हते, मुलांची खेळणी, यांचे व्यायामाचे साहित्य (मोठ्या हौसेने घेतलेले), दोन तीनचाकी आणि एक लेडीज दोनचाकी सायकल. जुन्या कपड्यांची चारपाच गाठोडी, न लागणारी भांडी, त्यात एक बंबही होता. खरं तर तो मोडीत टाकायचा होता, पण सासूबाईंची आठवण असल्याने यांचा त्याला विरोध. गेली सहासात जास्तच मला वाटते आठदहा वर्षे तो असाच अडगळीत पडला आहे. मुलांची लहानपपासूनची खेळणी, दोनतीन मोठे मोठे टेडी, डझनभर पर्स, आणि एका कोपऱ्यात पुस्तकांचा ढीग….अणि बरेच काही सटरफटर. हे सारे पाहून माझे डोके गरगरू लागले, तरीही मी एका कोपऱ्यापासून छत्रीशोधास सुरुवात केली.

आमचा माळा म्हणजे एक प्रस्थच आहे. 20 गुणीले 15 च्या हॉलवर संपूर्ण माळा आहे. त्यात एखादा हत्ती हरवला तरी शोधणे मुश्‍किल, मग लेडीज छत्र्या शोधायच्या म्हणजे महासंकट, पण मला पूर्वीपासून महासंकटांना गुपचुप सामोरे जायची सवय आहे, सवय झाली आहे म्हटले पाहिजे. एका कोपऱ्यातील वस्तू इकडे तिकडे सरकवत मी तेथे शोध घेतला. हाती काहीच आले नाही. कपडे खराब झाले, केसात धूळ बसली, हातपाय खराब झाले. मनातल्या मनात चरफडत मी दुसऱ्या कोपऱ्याकडे वळले. पुस्तकांच्या. पुस्तके इकडे तिकडे करायला सुरुवात केली. तेवढ्यात “माहेरचा आहेर. हे पुस्तक हाती आले. उत्साहाने ते चाळले आणि बाजूल ठेवले खाली नेण्यासाठी. तेवढ्यात स्नेहलता दसनूरकरचे पुस्तक हाती आले. 21 उबदार प्रेमकथांचा संग्रह-स्नेहकथा. 35-40 वर्षांपूर्वी भावाने दिलेले ते अत्यंत सुरेख पुस्तक हरवले असे मला वाटले होते. ते पाहून आनंदाने आरोळी मारायचीच बाकी राहिले. दोन्ही पुस्तके मी बाजूला ठेवली, तेवढ्यात खालून प्राची ओरडली, अगं आई, माळ्यावर काय करतेस? आपल्या छत्र्या कपाटावर पिशवीत घालून ठेवल्या नाही का? कशी गं तू विसराळू?
मी विसराळू काय? थांब तुझ्याकडे बघते, असे म्हणत लटक्‍या रागाने मी खाली उतरले. खरं तर स्नेहकथा आणि माहेरचा आहेर हाती आल्याने मी खुषच झाले होते.

– अनुराधा पवार

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.