आता यांचा शोध! “गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचे इन्फेक्शन होत नाही, मीही पिते”; प्रज्ञासिंह ठाकूर यांचा शोध

भोपाळ: देशात एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. या लाटेला रोखण्यासाठी सर्व यंत्रणा दिवसरात्र एक करून काम करत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या मंत्र्यांकडून रोज जावई शोध लावण्यात येत  आहेत. या मंत्र्यांच्या यादीत आता आणखी एकाचा समावेश झाला आहे.

नेहमीच आपल्या वादग्रस्त  वक्तव्याने  चर्चेत येणाऱ्या भाजपच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आता नव्या विधानाने चर्चेत आल्या आहेत. त्यांनी नागरिकांना आता गोमूत्र पिण्याची आणि गो पालन करण्याचे आवाहन केले आहे. गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचा संसर्ग दूर होतो. मी स्वत: गोमूत्र घेते, त्यामुळेच मला कधी कोणतं औषध घ्यावं लागलं नाही. मला कोरोनाही झाला नाही, असे  प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटले आहे.

संत नगरमधील डॉ. हेडगेवार रुग्णालयाला 25 ऑक्सिजन कंसन्ट्रेटर देण्यासाठी प्रज्ञासिंह ठाकूर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे अजब विधान केले. देशी गाय पाळण्याचे  त्यांनी आवाहन केले. तसेच एक कोटी वृक्ष लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या संकटाच्या प्रसंगी सर्वांनी सावध राहिले  पाहिजे. कोरोनाशी संबंधित गाईडलाईन सर्वांनी पाळली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. मध्य प्रदेशात कोरोनाचा प्रचंड कहर वाढला आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या बंगल्यातील सर्व कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ठाकूर यांना क्वॉरंटाईन व्हावे लागले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.