पिंपळे गुरव (वार्ताहर) – पिंपरी-चिंचवड शहरातील फुगेवाडीमध्ये येथे शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. त्यामुळे हा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच या परिसराला प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. या वेळी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता कर्मचारी यांचेकडून प्रतिबंधित क्षेत्रात जंतुनाशक सोडियम हायड्रोप्लॉराईड औषध फवारणी मशीनद्वारे करण्यात आली.
या वेळी माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत फुगे, सामाजिक कार्यकर्ते मनोज वाखारे, सांगवी विभागातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, आरोग्य सहायक सचिन घनवट आदींनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेल्या परिसराची पाहणी केली.
फुगेवाडी येथील करोनाची लागण झालेला रुग्ण 32 वर्षीय पुरुष आहे. तो एक रिक्षाचालक आहे. शुक्रवारी वैद्यकीय अहवालात त्या व्यक्तीचा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याला खडकी कॅन्टोन्मेंट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आजूबाजूच्या परिसरात आमच्या परिचारिका सर्व्हे करीत आहेत. यामध्ये वर्षा तरडे, मंगल बांगर, सरुबाई घंटे आदी परिचारिका ग्रुपद्वारे सर्व्हे करीत आहेत, असे डॉ. विजया आंबेडकर यांनी सांगितले.