सफर अवश्‍य करा जलदुर्गांची…

इतिहासकाळातील सागरी किल्ले आजही प्रेरणादायी

यावर्षी दिवाळीच्या सुट्‌टया लागण्याची प्रतिक्षा नाहीच. दिवाळी अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपलेली असताना, फिरायला कोठे जायचे, असा प्रश्‍न पडत असेल, तर आम्ही तुम्हाला सुचवतो की, महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील सागरी किल्ले पहायला यंदा अवश्‍य जा. ऐतिहासिक काळापासून वर्षानुवर्षे सागरी लाटांचा मारा झेलत उभे असलेले ही सागरी किल्ले आजही आपल्यासाठी प्रेरणादायीच ठरतात.

1. सुवर्णदुर्ग
वर्ष 1660 मध्ये महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेत, किल्ल्याची डागडुजी केली. दापोली-आंजर्ल्यापासून जवळ असलेला व हर्णेच्या बंदराजवळ वसलेला हा दुर्ग समुद्रात एका विशाल खडकावर बांधला आहे. या जलदुर्गाचे संरक्षक दुर्ग म्हणून गोवादुर्ग, फत्तेगड व कनकदुर्ग उभारण्यात आले आहेत. खडक फोडून तयार केलेली तटबंदी हे या दुर्गाचे वैशिष्ट्ये. कान्होजी आंग्रे यांनी सुवर्णदुर्गाच्या बळावर सागरावर आपले वर्चस्व गाजविले. शिलाहारांपासून या दुर्गाचा इतिहास सांगता येतो. सिद्दीने सुवर्णदुर्ग ताब्यात घेण्याचा केलेला प्रयत्न कान्होजी आंग्रेंनी शिताफीने हाणून पाडला. या किल्ल्याचा परिसर जवळपास 8 एकर आहे. किल्ल्याच्या महाद्वाराजवळ पायरीवर कासवाचं शिल्प आहे, तर उजव्या बाजूला तटबंदीवर हनुमानाची मुर्ती कोरलेली आहे. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकराच्या दोन देवड्या आहेत. सुवर्णदुर्गाच्या आत सात विहिरी, पडझड झालेले वाड्याचे अवशेष व काही तोफा आहेत.
कसे जाल?
मुंबई-गोवा महामार्गावर खेडला उतरावे. तेथून दापोलीहून हर्णे बंदरात जाता येते. बंदरातून होडीने सुवर्णदुर्गावर जाता येते. तसेच मुरुड किंवा आंजर्ल्याहून होडीने या जलदुर्गावर पोहोचता येते.

उंदेरी (जयदुर्ग)
खांदेरी किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी आणि मराठ्यांच्या समुद्रातील हालचालींना चाप लावण्यासाठी सिद्दीने खांदेरी पासून दीड किमी अंतरावर असलेल्या उंदेरी बेटावर हा किल्ला बांधला. मराठ्यांनी सिद्दीचा हा बेत तडीस जाऊ नये म्हणून उंदेरीवर अनेक हल्ले चढवले. पण त्यात अपयश आले. संभाजीराजांच्या काळात वर्ष 1680 मध्ये रात्रीच्या वेळी हल्ला करण्यात आला, पण सिद्दीला आधीच सुगावा लागल्यामुळे 80 मराठे मारले गेले. तसेच मायनाक भंडारीचा मुलगा ठार झाला. हा किल्ला बांधल्यापासून सिद्दी व मराठे यांच्यात कायम चकमकी होत राहील्या. वर्ष 1681 मध्ये संभाजी महाराजांनी उंदेरीवर निर्णायक केलेल्या हल्ल्यामध्ये सिद्दीचे प्रचंड नुकसान झाले. पण त्यांना किल्ला जिंकता आला नाही. पुढे वर्ष 1760 मध्ये नारो त्रिंबकनी किल्ला जिंकून, त्याचे नाव जयदुर्ग ठेवले. सिद्दीने अनेक प्रयत्न करुनही 1818 पर्यंत किल्ल्याचा ताबा मराठ्यांकडेच राहीला. वर्ष 1818 मध्ये इंग्रजांकडे उंदेरीचा ताबा गेला, त्यांनी 1824 मध्ये तो आंग्रेना दिला. नंतर पुन्हा तो इंग्रजांच्या ताब्यात आला. वर्ष 2006 मध्ये महाराष्ट्र सरकारने उंदेरी किल्ला डॉल्फिन स्टोनक्रेस्ट इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला विकला होता. पण जन आंदोलनामुळे हा विक्री करार रद्द करण्यात येऊन, हा किल्ला ऐतिहासिक वास्तु असल्याचे जाहीर केले. किल्ल्यावरील तीन हौद, राजवाड्याचे अवशेष, तोफा, भिंतीतील कोनाडे, देवळ्या, प्रवेशद्वार पाहण्यासारखे आहेत.
कसे जाल – हा किल्ला मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ताब्यात असल्याने, त्यावर जाण्यासाठी ट्रस्टची लेखी परवानगी लागते. उंदेरी बेटावर जाण्यासाठी अलिबाग जवळील थळ गावाच्या किनाऱ्यावरून होडी ठरवून खांदेरी व उंदेरी हे दोन्ही किल्ले एका दिवसात पाहाता येतात. बेटावर उतरण्यासाठी धक्का नसल्यामुळे भरती – ओहोटीच्या वेळा पाहून किल्ल्‌यावर जाता येते.

खांदेरी
इंग्रज व सिद्धी यांच्यावर वचक बसविण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुंबईपासून 15 मैलावर असणाऱ्या खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याचे ठरवले. महाराजांनी किल्ल्याची जबाबदारी मायनाक भंडारीकडे सोपविली. भर पावसाळ्यात खांदेरीचे काम सुरू झाले. आपल्या एकशे पन्नास सहकाऱ्यासह आणि चार तोफांसहीत मायनाकने इंग्रजांना न जुमानता किल्ल्याचे काम चालू ठेवले. खांदेरीचे बांधकाम करणारे कामकरी इंग्रजांचा हल्ला परतवून लावण्यासाठी प्रसंगी धारकरी होत. इंग्रजांचा विरोध मोडून काढत मायनाक यांनी खांदेरीचा जलदुर्ग उभा करुन स्वराज्यातील जलदुर्गांची मजबूती फळी उभी केली. पुढे 1701 रोजी सिद्‌दी याकूत खानने खांदेरी’ वर केलेला हल्ला मराठयांनी तो परतावून लावला. 1718 मध्ये इंग्रजांनी किल्ल्यावर केलेला हल्ला किल्लेदार माणकोजी सूर्यवंशी याने पाचशे माणसांनीशी लढवून, इंग्रजांना मात दिली. नंतर 1814 मध्ये खांदेरी पेशव्यांच्या ताब्यात गेला. 1817 मध्ये किल्ला पुन्हा आंग्रेकडे गेला. तर 1818 मध्ये खांदेरी इंग्रजांच्या ताब्यात गेला. किल्ल्याची मजबूत तटबंदी, वेताळाचे मंदिर, भांड्याचा आवाज येणारा खडक, गाड्यांवर असणाऱ्या तोफा, दिपगृह पाहण्यासारखे आहे. सध्या आयएनएस खांदेरीचे हे स्टेशन करण्यात आले आहे. त्यामुळे किल्ल्याच्या काही भागांत जाता येत नाही.
कसे जाल?
थळ मार्गे – या जलदुर्गांवर जाण्यासाठी अलिबागला जावे लागते. अलिबागपासून अलिबाग-मांडवा रस्त्यावर चार किमी अंतरावर थळ गावात यावे. थळ बाजारपेठेजवळून किल्ल्यावर जाण्यास बोटी मिळू शकतात.

पद्मदुर्ग
जंजिऱ्याच्या सिद्दीच्या उपद्रवाला आळा घालून, त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुड शहराच्या पश्‍चिमेला सुमूद्रात एका बेटावर या किल्ल्याची उभारणी केली. कासवाच्या आकाराच्या बेटावर बांधकाम झाल्याने या किल्ल्याला कासा किल्लाही संबोधले जात असे. तर किल्ल्याच्या तटबंदीचे बुरूज कमळाच्या आकारासारखे असल्याने पद्मदुर्ग हे नावही पडले. मावळ्यांनी रात्रंदिवस एक करुन, सिद्दीशी लढतच मराठ्यांच्या पहिल्या सागरी किल्ल्याची उभारणी केली. पद्‌मदूर्गचे पहिले हवालदार म्हणून शिवरायांनी सुभानजी मोहीते यांची निवड केली. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही 1689 मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात असल्याचा उल्लेख इंग्रजांच्या पत्रात आहे. त्यानंतर पद्‌मदुर्ग सिद्दीच्या ताब्यात गेला. मराठ्यांनी पेशवेकाळात परत तो जिंकून घेतला. किल्ल्यावरील पडकोटचा कमळाच्या आकाराचा बुरूज दुरूनच आपले लक्ष वेधून घेतो. कोठार, तोफा ठेवण्यासाठी केलेले झरोके व त्यातील तीन तोफा आहेत. किल्ल्यावर प्रदक्षिणा मारताना तटबंदीवर व किल्ल्याच्या आत जागोजागी पडलेल्या तोफा दिसतात. याशिवाय तटबंदीला लागून असलेली पडकी वास्तू , दोन हौद व त्यामधील थडगी दृष्टीस पडतात. किल्ल्याला सहा बुरुज आहेत. पद्‌मदुर्ग व पडकोट मिळून 38 तोफा आहेत. पश्‍चिमेला असलेल्या बुरुजावरून पद्‌मदूर्गच्या पडकोटाचे विहंगम दृश्‍य दिसते. वास्तूंचे काही अवशेष, हौद, कोठ्या आहेत. या किल्ल्यावरून सामराजगड व मुरुडचा किनारा दिसतो.
कसे जाल?
मुरुड गाव संपल्यावर खाडी लागते. त्या खाडीतून पद्‌मदूर्गावर जाण्यासाठी खाजगी होडी ठरवावी लागते. खाडीपासून 20 मिनीटांचा प्रवास करुन पद्‌मदूर्गावर पोहचतो.

अभेद्य-अजिंक्‍य जंजिरा
खडकाळ बेटावर जंजिरा किल्ला चौल व दाभोळ या प्राचीन बंदरांच्या मधोमध वसला आहे. त्याला मुरुड-जंजिरा असेही म्हणतात. जझीरा (बेट) या अरबी शब्दावरुन जंजिरा हे नाव रुढ झाले आहे. येथे पूर्वी कोळ्यांची वस्ती होती. दर्यावर्दी चाचे व लुटारुंपासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांनी लाकडी मेढेकोट बांधला होता. किल्ल्याला 13 ते 15 मी.उंचीची तटबंदी, असून महादरवाजा हुलमुखनामक दोन बुरुजांमध्ये आहे. त्याच्या कमानीवर अरबीत काळाचा उल्लेख असलेला कोरीव लेख आहे. येथे आजही सुस्थितीत असलेले 22 बांधलेले बुरुज आहेत. त्यातून माऱ्याची जागा तसेच आतील बाजूस विश्रांतीची जागा आहे. त्यात दारुगोळा ठेवण्याची सोय होती. तटभिंतींच्या आतील बाजूस चहूबाजूंनी खंदक होता. बालेकिल्ल्‌यात शियापंथीय पीराचे पंचायतन स्मारक असून कार्तिक पौर्णिमेला जत्रा भरते. मुळात हे कोळ्यांचे जुने श्रद्घास्थान असून त्यास रामपंचायतन म्हणतात. जवळच सिद्दी घराण्यातील पुरुषांच्या-सरदारांच्या कबरी आहेत. कोटात चार मशिदी, तलाव, मोहल्ले, वाडे वगैरेंचे अवशेष आढळतात. याशिवाय तेथील तीन देशी व सहा विदेशी तोफा हे पर्यटकांचे आकर्षण होय. कलालबांगडी ही सर्वात मोठी तोफ आहे. किल्ल्यात अनेक फार्सी शिलालेख आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजांनी जंजिरा घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अरबी समुद्राच्या पश्‍चिम किनाऱ्यावरील हा सुप्रसिद्घ किल्ला मराठे, डच, इंग्रज आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्या सैन्यांनी अनेकदा हल्ले करुनही अजिंक्‍य राहिलेला आहे.
किल्ल्यावरील पीरपंचायतन, घोड्याच्या पागा, सुरुलखानाचा वाडा, तलाव, सदर, बालेकिल्ला, पश्‍चिम दरवाजा पाहण्यासारखा आहे. सर्व किल्ला पाहण्यास तीन तास लागतात. सिद्दी लोक पराक्रमी, लढवय्ये होते, त्याचबरोबर उत्तम खलाशी होते. अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात चाचेगिरी करण्याचा त्यांचा उद्योग होता. 20 सिद्धी सत्ताधिशांनी मिळून 330 वर्षेराज्य केले आणि 1948 मध्ये जंजिरा संस्थान भारतीय संघाराज्यात विलीन झाले.
कसे जाल?
1. पुणे-मुंबई मार्गे अलिबाग गाठायचे. पुढे अलिबागवरुन रेवदंडामार्गे मुरुड गाठता येते. मुरुड गावातून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बोटसेवा उपलब्ध आहे. 2. अलिबाग मार्गे न जाता पाली-रोहा-नागोठाणे-साळाव- नांदगाव मार्गे मुरुडला जाता येते.
3. दिघीमार्गे कोकणातून यावयाचे झाल्यास महाड-गोरेगाव-म्हसळे-बोर्लिपचंतन दिघी गाठावे. दिघीहून बोटसेवा उपलब्ध आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.