नवी दिल्ली – गुजरात दंगलीवर आधारित बीबीसीने ‘इंडिया: द मोदी क्वेशन’माहितीपट नुकताच प्रदर्शित केला होता. त्याचा पहिला भाग प्रसारित झाल्यानंतर आता दुसऱ्या भागावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. यावरून आता राजकारण देखील चांगलेच तापू लागले आहे. ABVP अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून याला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात झाली आहे.
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) ने हैदराबाद विद्यापीठात २००२ च्या गुजरात दंगलीवर बीबीसीचा एक वादग्रस्त माहितीपट प्रदर्शित केला . याला प्रत्युत्तर म्हणून ABVP ने गुरुवारी विद्यापीठ परिसरात काश्मिरी पंडितांच्या छळ आणि नरसंहारावर आधारित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट दाखवला. चित्रपट आणि माहितीपटावरून देखील आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.
हैदराबादमध्ये दाखवण्यात आलेल्या माहितीपटाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. याला प्रत्युत्तर म्ह्णून अभाविपने देखील गुरुवारीच ‘द काश्मीर फाइल्स’चे स्क्रीनिंगही आयोजित केले होते. यानंतर हैदराबाद विद्यापीठाचे रजिस्ट्रार देवेश निगम यांनी एक निवेदन जारी केले.
निवेदनामध्ये निगम म्हणतात, कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर,डीन-विद्यार्थी कल्याण यांनी विद्यार्थ्यांच्या गटांचे समुपदेशन केले आहे. तसेच शांतता राखण्यासाठी चित्रपटांचे प्रदर्शन बंद करण्यात आले आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी आपल्या रुटीननुसार पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील मोहिमेला हवा देत केरळच्या राज्य काँग्रेस कमिटीने गुरुवारी षणमुगम बीचवर सामान्य लोकांसाठी बीबीसीचा वादग्रस्त माहितीपट प्रदर्शित केला. 2002 च्या गुजरात दंगलीवर आधारित हा चित्रपट दाखवताना काँग्रेस नेत्यांनी दावा केला की या चित्रपटासाठी त्यांना सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळत आहे. आता प्रदेश काँग्रेस हा वादग्रस्त माहितीपट संपूर्ण राज्यात दाखवणार आहे.