– तुषार घाडगे
बॉलिवुडमध्ये अभिनेता-अभिनेत्रींच्या लॉन्चविषयी अनेकदा चर्चा रंगत असते. यात सलमान खानने अनेक अभिनेत्रींना सिनेसृष्टीत संधी दिल्याचे सांगितले जाते. तसेच आमिर खानसोबत पर्दापण केलेल्या अभिनेत्रींची करिअर फारशी चांगली नाही, असे बोलले जाते. पण बॉलिवूडमध्ये सर्वाधिक अभिनेत्री लॉन्च करण्याचा विक्रम ऋषी कपूर यांच्या नावे असल्याचे काही निवडक जणांनाच माहिती आहे. ऋषी कपूर यांच्यासोबत 20हून अधिक अभिनेत्रींनी त्यांच्या करिअर सुरू केली आहे. यात डिंपल कपाडिया, जया प्रदा, गौतमी कपूर अशी नावे आहेत, ज्यांनी नंतर इंडस्ट्रीत एक विशिष्ट उंची गाठली.
ऋषी कपूरबरोबर लॉन्च होणा-या पहिल्या अभिनेत्रीचे नाव आहे डिंपल कपाडिया. डिंपलने तिच्या करिअरची सुरुवात 1973मध्ये “बॉबी’ चित्रपटाने केली होती. यात मुख्य नायकाची भूमिका ऋषी कपूरने साकारली होती. डिंपल तेव्हा फक्त 16 वर्षांची होती. त्यानंतर तिने बॉलिवुडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले.
डिंपलनंतर काजल किरणने 1977मध्ये “हम किस से काम नहीं’ या चित्रपटाने करिअरची सुरुवात केली. यानंतर तिला सुमारे 20 चित्रपटांत नायिका म्हणून साईन करण्यात आले होते. यानंतर सोमा आनंदने तिच्या करिअरची सुरूवात “डायनामाइट’पासून पासून केली आणि “कुली’सारख्या हिट चित्रपटात ती ऋषिच्या अपोजिट झळकली होती.
त्याचप्रमाणे भावना भट्टने “दो जासूस’, तर जया प्रदाने “सरगम’ या पहिल्या हिंदी चित्रपटात ऋषिच्या अपोजिट भूमिका साकारली होती. यानंतर जया प्रदाने “सिंदूर’, “घर घर का कहानी’, “घराना’, “प्यारा घर’, “धरतीपुत्र’ यासारख्या चित्रपटात ऋषि कपूरसोबत मुख्य नायिकेच्या भूमिका साकारल्या. यानंतर इंडस्ट्रीमध्ये जया प्रदा आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जावून लागली.
तसेच तमिळ स्टार राधिकाने हिंदी चित्रपटसृष्टीत आपले नशिब आजमावण्याचा विचार केला तेव्हा नायक म्हणून तिने ऋषी कपूरला पहिली पसंती दर्शविली होती. या दोघांनी “नसीब अपना अपना’मध्ये एकत्रीत काम केले होते.
नसीमने आपल्या कारर्किदीत एकच चित्रपट केला, तोही ऋषी कपूरसोबत.”कभी कभी’मध्ये ती अमिताभ आणि वहीदाच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर नसीम ही ऋषीच्या प्रेमात पडली होती. परंतु ऋषी कपूर नीतू सिंगच्या प्रेमात पडला होता.
“सांभर सालसा’मध्ये प्रियांका, तर “लैला मजनू’मध्ये रंजीताने ऋषीसोबत आपल्या करिअरची सुरुवात केली. “चांदनी’ चित्रपटातून मीता वशिष्ठ, “नकाब’मधून गौतमी, तर “हिना’मधील जेबा बख्तियार आणि अश्विनी भावे असो की “दरार’मधील शीला शर्मा, “कुछ तो है’मधून नताशापर्यत अनेक अभिनेत्रींनी ऋषी कपूरबरोबर पदार्पण केले.
इंडस्ट्रीत सुमारे 30 वर्षे काम केल्यानंतरही त्यांच्याबरोबर बॉलिवुडमध्ये पर्दापण करण्यासाठी अभिनेत्री उत्सुक होत्या. “विजय’ चित्रपटात सोनमने, तर कुसुमित सनाने “कुछ तो है’मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तसेच “फना’ चित्रपटातून गौतमी कपूरने पदार्पण केले होते.
यात आमिर खान-काजल व्यतिरिक्त ऋषी आणि गौतमी कपूर मुख्य भूमिकेत होते. तसेच “फना’मधून सनाया इराणीनेही आपल्या करिअरची सुरुवात केली होती. याशिवाय पद्मिनी कोल्हापूर, दिव्या भारती आणि तब्बूपर्यंतचा पहिला चित्रपट ऋषी कपूर यांच्यासोबत रिलीज झालेले आहेत. मात्र, या तिन्ही अभिनेत्रींच्या चित्रपटात त्यांच्यासोबत मुख्य नायक म्हणून अन्य कलाकारांनी भूमिका साकारली होती.