पिंपरी – करोना महामारीने थैमान घातले आहे. दोनशेपेक्षा अधिक लोकांना या आजाराची लागण झाली आहे. अशा वेळेस पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने खासगी अनुदानित शाळेतील शिक्षकांनाही या लढ्यात सहभागी करून घेतले आहे.
फिल्ड सर्व्हेलियन्स टीम याअंतर्गत “करोना विषाणू कोव्हिड 19’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिक्षक कंटेन्मेंट झोन (संक्रमण सील) या ठिकाणी घरोघरी जाऊन नागरिकांचा सर्व्हे करीत आहेत. यामध्ये “थर्मल स्क्रीनिंग’द्वारे लोकांच्या शरीराचे तापमान मोजणे, उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा वा तत्सम आजार व गरोदर स्त्रियांविषयी माहिती गोळा करीत आहेत.
स्काऊटर संधान यांच्यासह अनिल भोसले, संदीप माकरे, सुधीर बहिरट, अतुल सोरटे, प्रदीप नागवडे, आनंद थोरवत, महेश तांबे हे शिक्षकही सहभागी झाले आहेत. प्राचार्य राम गोन्टे, उपप्राचार्या अंजली घोडके, जनता शिक्षण संस्थेचे सचिव व पर्यवेक्षक सुभाष गारगोटे, विश्वास जाधव यांनी या करोनाविरुद्ध लढ्यातील स्काऊट विभाग व सहभागी शिक्षकांनी आरोग्याची काळजी करण्याचे आवाहन केले आहे.