पोटाच्या स्थायूंना व्यायाम देणारे वृश्‍चिकासन

वृश्‍चिकासन हे दंडस्थितीतील आसन आहे. वृश्‍चिक म्हणजे विंचू. शरीराचीस्थिती ही विंचवाच्या आकृतीसारखी करणे म्हणजेच वृश्‍चिकासन होय. जे लोक शीर्षासन उर्ध्वपद्‌मासन हस्तवृक्षासन उत्तम करतात, त्यांनाच हे आसन जमू शकते.

हे आसन करताना नवशिक्‍यांनी तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय करूच नये. तसेच सुरुवातीला भिंतींचा आधार घेऊन करावे. सुरुवातीला दोन्ही हात आणि कोपरे जमिनीला टेकवावेत. ही स्थिती साधल्यावर भिंतीच्या आधाराने पोट भिंतीला लावावे आणि पाय भिंतीशी सरळ ठेवावे. ही स्थिती साधण्याचा खूप सराव करावा.

ही स्थिती साधल्यावर पाय भिंतीपासून पाच ते सहा सेंटिमीटर लांब करून तोल सावरण्याचा प्रयत्न करावा. नेहमीचे श्‍वसन चालू ठेवावे. हळूहळू तोल सांभाळता येऊ लागतो आणि मग एक दिवस पाय गुडघ्यात दुमडून पायांचे तळवे डोक्‍यावर ठेवावेत. यासाठीसुद्धा अथक सराव लागतो हे विसरू नये.

हाताच्या पंजावर संपूर्ण शरीर तोलणे सोपे नाही. पण योगमहर्षि महामुनी पंतजलींच्या भाषेत सांगायचे तर प्रयत्नशैथिल्य हवे म्हणजे अनंतसमापत्ती म्हणजे अनंताशी एकरूप होण्याची अवस्था प्राप्त होते पण त्यासाठी जागृकपणे योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाची आवश्‍यकता आहे, हे अजिबात विसरू नये. या आसनाच्या नियमित सरावामुळे हात,खांदे मजबूत आणि सुदृढ बनतात आणि पोटाच्या स्नायूंनाही चांगला व्यायाम मिळतो. विंचू ज्याप्रमाणे आपली नांगी वर काढून चालतो त्याप्रमाणे हे आसन केले जाते व दिसते.

दोन्ही हात आसनस्थानी कोपरांपासून पंजांपर्यंत टेकवावेत. डोके वर उचलून धरावे, एक पाय मागे ठेवून त्या पायाने धक्‍का देऊन दोन्ही पाय वर न्यावेत, पाय ताठ केल्यावर दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून डोक्‍यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करावा. या आसनाचा कालावधी पाच ते दहा सेकंद आहे. कारण कंबरेवर खूप ताण येतो. वृश्‍चिकासनाची पूर्वतयारी म्हणजे धनुरासन होय. धनुरासन चांगले करता येणाऱ्यांना वृश्‍चिकासन चांगले करता येते. हातांमध्ये पुरेशी ताकद हवी. हे आसन तोलात्मक आहे, तोल सांभाळता आला पाहिजे, नाहीतर तोंडावर आपटण्याची शक्‍यता असते.

एकदा जमू लागल्यावर सरावाने याचा कालावधी वाढवता येतो. या आसनामुळे आत्मविश्‍वास वाढतो. कंबरदुखी तत्काळ थांबते, ओटीपोटाची शुद्धता होते, शरीराच्या समोरच्या भागाला ताण येतो, मानेलाही ताण येतो, त्यामुळे मानेतील दोष दूर होतात. स्त्रियांनी हे आसन करताच स्त्रियांच्या शरीरातील ग्रंथींचे कार्य सुधारते.

मासिकपाळीचे जे प्रॉब्लेम असतात ते या आसनाने सुधारतात. पोटाला व पाठीला तीव्र स्वरूपाचा धन व ऋण दाब निर्माण होतो. हे आसन पौगंडावस्थेत केले असता उंची वाढण्यास मदत होते. मानसिक विकार बरे होतात, मस्तकाकडे रक्‍तप्रवाह सुलभपणे जातो, हार्नियावर उपयुक्‍त आहे. स्त्रियांनी पंचेचाळीस वर्षांपर्यंतच हे आसन करावे.

वृश्‍चिकासनामुळे पाठीचा कणा लवचिक बनतो. शीर्षासन, चक्रासन आणि धनुरासनाचे असे सर्व तिहेरी फायदे मिळतात म्हणूनच या आसनाला विशेष महत्त्व आहे पण हे आसन सहजतेने जमत नाही तसेच डोक्‍याचे, मेंदूचे, हृदयाचे विकार असलेल्यांनी हे आसन करू नये. एरव्हीसुद्धा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हे आसन करावे. स्त्रियांनी हे आसन मासिकधर्मामध्ये व गर्भावस्थेमध्ये करू नये.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.