पुणे/खडकवासला – दहावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यावर्षीही अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादित केल्याचं निकालातून समोर आलं आहे. पुण्यातील अशाच एका गुणवंत विद्यार्थ्याची चर्चा सध्या सुरु आहे. मृदुल महेंद्र दारवटकर असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याने दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवले आहेत.
एसएससी बोर्डाच्या पुणे शैक्षणिक विभागात १०० टक्के गुण मिळवणाऱ्या पाच विद्यार्थ्यांमध्ये मृदुलचा समावेश आहे. मुळात दारवटकर कुटुंब हे वेल्हे तालुक्यातील रांजणे येथील असून वडील महेंद्र दारवटकर हे माहीती व तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत आहेत. आई ज्योती दारवटकर या गृहिणी आहेत.
“नियमित अभ्यास शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचा सपोर्ट यामुळे हे यश संपादन करता आले. विशेष म्हणजे माझी मोठी बहीण मृणाल हिचे देखील मार्गदर्शन मोलाचे होते. ह्या यशाचे श्रेय मी माझे आई, बाबा, ताई, शिक्षक व नातेवाईक यांना देत आहे. भविष्यात इंजिनिअरिंग करण्यासाठी आय. आय. टी. सारख्या मानांकित शैक्षणिक संस्था मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.” असे मृदुलने प्रभातशी बोलताना सांगितले.