अबाऊट टर्न: स्कूटर

हिमांशू
चार दिवस तुझा आणि तुझ्या स्कूटरचा विचार करतोय. पंक्‍चर झालेली स्कूटर. टोल नाक्‍याजवळ सापडलेली. हैदराबादसारख्या पुढारलेल्या शहराची तू नागरिक. शिकली-सवरलेली. स्वतःच्या पायावर उभी राहिलेली. स्वकर्तृत्वानं, स्वाभिमानानं जगणारी. आणि हा किडलेला समाज… तुझ्या पंक्‍चर झालेल्या स्कूटरसारखा. स्त्री-पुरुष ही त्याची दोन चाकं. एक कायम पंक्‍चर झालेलं (नव्हे, मुद्दाम पंक्‍चर केलेलं) आणि दुसरं सदान्‌कदा अहंकारानं टण्ण फुगलेलं. अशा वाहनावरून जायचंय आम्हा सगळ्यांना आधुनिक युगाच्या दिशेनं… भरधाव वेगात! देशाला जगातली एक मोठ्ठी अर्थव्यवस्था बनवायचंय. नुसत्या आवाजाच्या इशाऱ्यावर नोकरासारखं काम करणारी अत्याधुनिक उपकरणं येऊ लागलीत आमच्या हातात.

कृत्रिम बुद्धिमत्तेनं आमचं जगणं अधिकाधिक सुखवस्तू होत जाणार आहे. पण आमची नैसर्गिक बुद्धी मात्र जशीच्या तशी राहिलीय. माणूस आणि मशीन एवढाच भेदाभेद शिल्लक राहण्याच्या अवस्थेला पोहोचलो, तरी अजून आम्ही माणसामाणसात भेदाभेद करतोच आहोत. कधी जातीच्या नावानं, कधी धर्माच्या नावानं, कधी वंशाच्या तर कधी भाषेच्या नावानं. स्त्री-पुरुष भेद तर आमच्या नसानसात भिनलेला. हे दोघं एकत्र येतात तेव्हा “माणूस’ जन्माला येतो; पण दोघं एकमेकांकडे “माणूस’ म्हणून पाहू शकत नाहीत, अशी अवस्था! काहीजण तर “माणूस’ जन्माला येण्यापूर्वीच त्याचं लिंग तपासून “निर्णय’ घेतात… त्या जीवाला जगात येऊ द्यायचं की पोटातच मारून टाकायचं, याचा! किती आधुनिक ना?
माणूस संपलेल्या जगात माणूस म्हणून जन्माला येऊन तू जनावरांची डॉक्‍टर झालीस, ते बरं झालं. पण पुरुष असलेल्या जगात स्त्री म्हणून जन्माला आलीस ते मात्र चुकलंच! आजारी जनावरांना तपासताना, त्यांना औषधं देताना तुला कल्पनाही आली नसेल, की माणूस नावाचं जनावर किती “आजारी’ आहे. जनावरंसुद्धा इतकी हिंस्र झाल्याचं तू पाहिलं नसशील.

पण त्या दिवशी तुझी स्कूटर पंक्‍चर झाली आणि त्यानंतर तुला खरी जनावरं दिसली. पंक्‍चर काढून देतो, असं सांगून त्या जनावरांनी तुला हेरलं. तू धाकट्या बहिणीला फोन लावलास. तिनं तुला टोल नाक्‍याजवळ स्कूटर ठेवायला सांगितलं. नंतर मात्र तुला हेरणाऱ्यांनी तुला चक्‍क घेरलं. बहीण तुला फोन लावत राहिली; पण तुझा फोन स्विच ऑफ झालेला. तुझ्या घरच्यांनी पोलिसात धाव घेतली आणि पोलिसांनी नेहमीप्रमाणं “घटनास्थळ आमच्या हद्दीत येत नाही,’ असं सांगून त्यांना वाटेला लावलं. हद्दीतल्या पोलीस ठाण्यात तू बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली गेली; पण दुसऱ्या दिवशी पहाटे एका दूधवाल्या तरुणाला पुलाखाली तुझा मृतदेहच दिसला… अर्धवट जळालेला. तुझं स्त्रीत्व ओरबाडल्यानंतर त्या जनावरांनी तुला जाळण्याचा प्रयत्न केलेला… घरच्यांची काय अवस्था झाली असेल पाहून?

तुझी ती पंक्‍चर स्कूटर डोळ्यांसमोरून जातच नाही. पाहिलेली नसली तरी दिसते. बरंच काही आठवत राहतं. निर्भयाचा क्रूर छळ, त्यानंतर कडक केलेला कायदा, त्यानंतरही सुरूच राहिलेले बलात्कार, त्यांचे लांबलेले खटले, साक्षीदारांसह बलात्कारित मुलीच्या गाडीला ट्रकनं दिलेली धडक, लहानग्या मुलींनाही न सोडणारे लांडगे… त्या साऱ्या अभागिनींच्या यादीत आता तुझं नाव समाविष्ट झालं. यादी संपणारच नाही असं वाटतं. घाबरवते आपल्या समाजाची स्कूटर… एक चाक पंक्‍चर झालेली!

Leave A Reply

Your email address will not be published.