दिव्यांग सफाई कर्मचाऱ्यांच्या पगाराला कात्री

दिव्यांगांना करोना काळात सवलत असताना अर्जित रजांचा वापर

पिंपरी – करोना विषाणू संसर्गाच्या काळात दिव्यांग सफाई कर्मचाऱ्यांना सवलत असताना त्यांना कामावर बोलावले जात आहे. कामावर न आल्यास त्यांना वेतन अदा केले जात नाही. तसेच, त्यांच्या अर्जित रजांचा वापर केला जात आहे. याबाबत काही सफाई कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने दिव्यांग कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात अत्यावश्‍यक सेवा देण्यासाठी हजर राहण्यापासून वगळण्यात आले आहेत. संबंधित आदेशानुसार दिव्यांग कर्मचारी हजेरी उपस्थितीत सवलत घेतलेली आहे. हे आदेश महापालिका अंतर्गत सर्व कार्यालयांना लॉकडाऊन असेपर्यंत व पुढील आदेशापर्यंत लागू राहतील, असे स्पष्ट नमूद केले आहे. मात्र, महापालिकेच्या सर्व विभागामध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्यात येत आहे. दिव्यांग कर्मचारी हे आपले आर्थिक नुकसान नको व कोणत्याही रजा संपू नये, या हेतूने भीतीपोटी व अज्ञानामुळे तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचे चित्र आहे. मात्र, काही कर्मचाऱ्यांनी पुढे येत याबाबत तक्रारी केल्या आहेत.

राज्य सरकारने 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढविलेला आहे. त्यामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहायचे की नाही, याबाबत स्पष्टीकरण मिळावे, अशी मागणी दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून केली आहे. “क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत काम करीत असलेल्या एका दिव्यांग कर्मचाऱ्याला 14 जून ते 14 जुलै या महिनाभराच्या कालावधीत कामावर बोलावण्याबाबत कोणताच आदेश नव्हता. संबंधित कर्मचाऱ्याने करोना संसर्गाच्या कारणामुळे हजेरीमध्ये सवलत घेतली होती. परंतु, त्याला संबंधित कालावधीतील वेतन अदा न केल्यामुळे आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष ऍड. सागर चरण यांच्याकडे तक्रार केली आहे.

“ग’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत कार्यरत असलेल्या दिव्यांग सफाई कर्मचाऱ्याला आरोग्य निरीक्षकाने 2 जूनपासून कामावर बोलाविले आहे. 24 एप्रिलच्या आदेशानुसार दिव्यांग कर्मचाऱ्यांना हजेरीमध्ये सवलत असताना त्यांनी माझ्या अर्जित रजा खर्ची टाकल्या. त्यामुळे माझ्यावर अन्याय झाला आहे. संबंधित रजा मला साठवणुकीत मिळाव्यात. याबाबत मला योग्य तो न्याय मिळायला हवा, अशी भूमिका संबंधित कर्मचाऱ्याने मांडली आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत दिव्यांग कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यापासून सवलत दिलेली आहे. जे स्वेच्छेने कामावर उपस्थित राहू इच्छितात त्यांना राहता येईल. कर्मचाऱ्यांना पगार न देणे, त्यांच्या अर्जित रजा खर्ची टाकणे अशा तक्रारी असतील तर त्या तपासून त्यानुसार कार्यवाही केली जाईल.
– मनोज लोणकर, सहाय्यक आयुक्त.


लॉकडाऊनच्या कालावधीत दिव्यांग कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यापासून सवलत असतानाही त्यांना कामावर बोलावणे, कामावर हजर न झाल्यास पगार कापणे, अर्जित रजा खर्ची टाकणे असे प्रकार होत आहेत. माझ्याकडे याबाबत कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांच्या तक्रारीची योग्य दखल घेण्याबाबत आयुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे.
– ऍड. सागर चरण, आरोग्य विभाग तक्रार निवारण समिती 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.