नवी दिल्ली : ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. सिंधिया यांनी मंगळवारी (10 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्ली येथे भेट घेतल्यानंतर आपला राजीनामा काँग्रेच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांना राजीनामा पाठवला आहे.
दरम्यान सिंधिया आज सायंकाळी सहा वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
इकॉनॉमिक्स टाईम्सच्या सूत्रानुसार, सिंधिया आज भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या वडिलांची स्वर्गीय माधवराव सिंधिया यांची जयंती आहे. राजीव गांधी आणि पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री होते.
1980 मध्ये कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले माधवराव सिंधिया यांचे स्थान कॉंग्रेस पक्षात मोठे होते. कॉंग्रेस पक्षाशी संबंध बिघडल्यानंतर माधवराव सिंधिया यांनी 1996 मध्ये काँग्रेस पक्ष सोडला होता.
काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर त्यांनी मध्य प्रदेश विकास कॉंग्रेसची(MPVC) स्थापना केली होती. याच पक्षाच्या तिकिटावर त्यांनी 1996 च्या लोकसभा निवडणूक लढवून त्यांचा ग्वाल्हेरमधून विजय झाला होता.
तथापि, काही दिवसांनंतरच माधवराव सिंधिया पुन्हा कॉंग्रेसमध्ये परतले होते. त्यांनी 1998 आणि 1999 च्या लोकसभा निवडणुकीत गुना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
1996 मध्ये कॉंग्रेसने ज्योतिरादित्य सिंधिया यांना वडिलांच्या जागी निवडणूक लढविण्याची ऑफर दिली होती पण त्यांनी ती नाकारली होती, असे वृत्त इंडिया टुडेमध्ये हरिंदर बावेजा यांनी प्रसिद्ध केले होते.
ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आजी विजयाराजे सिंधिया यांनी 1957 साली कॉंग्रेसमधून राजकारणाची सुरूवात केली होती . त्यांनी 1957 आणि 1962 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या तिकिटावर विजय मिळविला होता . त्यानंतर त्यांनी 1967 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
1971 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विजयाराजे सिंधिया जनसंघामध्ये सहभागी झाले होते. 2001 पर्यंत विजयाराजे सिंधिया भाजपात होत्या.
त्यानंतर त्यांचा मुलगा माधवराव सिंधिया यांनी 1996 मध्ये कॉंग्रेसपक्षाला सोडचिट्ठी दिली होती. तयानंतर तब्ब्ल 24 वर्षानंतर त्यांचा मुलगा जोतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला रामराम केला आहे.
यानंतर कमलनाथ सरकारला दहा आमदारांपैकी आठ आमदार परत आणण्यात आतापर्यंत यश आले आहे. मात्र, कॉंग्रेसचे दोन आमदार हरदीपसिंग डंग आणि रघुराज कंसाना अद्यापही बेपत्ता आहेत.
मध्य प्रदेश विधानसभेच्या 230जागा आहेत, त्यातील दोन जागा रिक्त आहेत. राज्यात सध्या २२8 आमदार आहेत, त्यापैकी 114 कॉंग्रेस, 107 भाजपा, चार अपक्ष, दोन बहुजन समाज पक्ष आणि एक समाजवादी पक्षाचे आमदार आहेत.
कमलनाथ यांच्या नेतृत्वात मध्य प्रदेशातील कॉंग्रेस सरकारला या चार अपक्ष आमदारांचे तसेच बसपा आणि सपाचे पाठबळ आहे.