हेलसिंकी – जगभरात सर्वत्रच कॉफीची वाढती मागणी लक्षात घेऊन आता शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत कृत्रिम कॉफी तयार करण्यात यश मिळवले असून नैसर्गिक पद्धतीने पिकवण्यात येणाऱ्या कॉफीप्रमाणेच या कॉफीचा गंध आणि स्वाद असणार आहे. ही कॉफी फिनलंडमधील व्हिटीटी टेकनिकल सेंटरच्या प्रयोगशाळेमध्ये विकसित करण्यात आली आहे.
प्रयोगशाळेत कृत्रिम पद्धतीने कॉफी तयार करण्यासाठी संशोधकांनी अरेबिका नावाच्या वनस्पतीची निवड केली. या अरेबिका वनस्पतींच्या पेशींचे नमुने घेण्यात आले या पेशींच्या नमुन्याच्या सहाय्याने जेनेटिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही कॉफी प्रयोगशाळेत तयार करण्यात आली.
पेशींपासून पदार्थ तयार करण्याच्या या प्रक्रियेला सेल्युलर एग्रीकल्चर असे म्हटले जाते. याच तंत्रज्ञानाचा वापर करून यापूर्वी प्रयोगशाळेमध्ये कृत्रिम मांस आणि दूध याचीही निर्मिती केली आहे. जगभरात कॉफीचे जे नैसर्गिक उत्पादन होते त्यापैकी 56 टक्के उत्पादन अरेबिका नावाच्या वनस्पती पासूनच होते. म्हणूनच संशोधकांनी कृत्रिम कॉफी तयार करण्यासाठी याच वनस्पतीचा वापर केला. या संशोधकांच्या टीमचं नेतृत्व करणाऱ्या डॉक्टर हीको रीसर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या कृत्रिम कॉफीची चव आणि गंध नैसर्गिक कॉफी प्रमाणेच आहे.
कोणालाही ही कॉफी कृत्रिम आहे म्हणून ओळखता येणार नाही. खरे तर 47 वर्षापूर्वी संशोधकांच्या मनात ही संकल्पना आली होती पण ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी इतकी वर्षे जावी लागली. कृत्रिमरित्या कॉफी करण्याच्या या नव्या तंत्रज्ञानाचा फायदा पर्यावरणालाही होणार आहे. कारण जगभरात सर्वत्र कॉफीची मागणी वाढत असल्याने इतर झाडे कापून त्या ठिकाणी कॉफीच्या झाडांची लागवड करण्याचे प्रमाण वाढत आहे.
आता कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेत कॉफी तयार होणार असल्याने इतर झाडे कापून कॉफीची झाडे लावण्याची गरज भासणार नाही. या पद्धतीने तयार करण्यात आलेली कॉफी 2025 पर्यंत बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येणार आहे.