मंचर -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील आदर्शगाव गावडेवाडी येथील हिरकणी विद्यालयात पुणे येथील आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था आयुका यांच्या वतीने वैज्ञानिक कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत 140 विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन आयुकाचे प्रकल्प समन्वयक रुपेश लबडे यांच्या हस्ते झाले. 8 वी ते 10 वी च्या विज्ञान पाठ्यपुस्तकातील वैज्ञानिक संकल्पना विविध विज्ञान खेळणी यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले, अशी माहिती मुख्याध्यापक विनोद बोंबले यांनी दिली.
अवकाशशास्त्र, सूर्यग्रहणाविषयी समाजातील श्रद्धा व अंधश्रद्धा, झीरो सावली दिवस, गुरुत्वीय लहरींचा शोध, कृष्णविवर, इस्रोचे सूर्यावरील पुढील मिशन याविषयी रुपेश लबडे यांनी माहिती दिली. आयुका गिरवली दुर्बिण, खोडद रेडिओ दुर्बिण रचना पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी भेट द्यावी, असे त्यांनी सांगितले, तसेच भविष्यकाळातील आयुका विज्ञान संस्थेतील विविध नोकरीच्या संधी उपलब्ध होतील याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रुपेश लबडे यांनी केले.
कार्यशाळेचे नियोजन ज्योती दहितुले,विठ्ठल रासकर, संदेश गावडे, संतोष टेमकर, संतोष मेंगडे, शरद गावडे, बापूराव गोसावी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनार्दन मेंगडे यांनी, तर निवृत्ती हुले यांनी आभार मानले.