मेघश्री दळवी
फेब्रुवारी अर्धा झाला आहे. करोना महामारीचा धसका थोडा कमी होताना दिसत आहे. ऑफिस-शाळा हळूहळू पूर्वपदावर येऊ पाहात आहेत. अशा वेळी अवकाश मोहिमांच्या तयारीमध्येही उत्साह वाढायला दिसत आहे. अवकाश संशोधनात गेल्या शतकापर्यंत मुख्यत: सरकारी संस्था भाग घेत होत्या. मात्र अलीकडे अनेक खासगी कंपन्या त्यासाठी पुढे येत आहेत आणि सरकारी संस्थांच्या जोडीने काम करत आहेत. वेगवेगळ्या देशांच्या संशोधकांमध्ये सतत एकत्र काम होतं आहे. ही बदलती परिस्थिती पाहता या क्षेत्रात झपाट्याने नवीन मोहिमा यशस्वीपणे उभ्या राहात आहेत.
आपला जवळचा शेजारी चंद्र अनेक देशांना खुणावतो आहे. त्यामुळे या 2021 वर्षात अनेक चांद्रमोहिमा भरारी घेणार आहेत. भारताचं चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण भागातल्या ऍटकिन खोऱ्यात उतरेल आणि तिथल्या बर्फसाठ्याचा वेध घेईल अशी प्राथमिक आखणी आहे. लॅंडर आणि रोव्हरची ही जोडगोळी या वर्षीच्या शेवटी अवकाशात झेप घेणार आहे. आतापर्यंत सात देश चंद्राजवळ जाऊन आलेले आहेत. अमेरिका,सोव्हिएत युनियन, चीन, जपान, युरोपियन युनियन आणि लक्झेम्बर्ग यांच्या जोडीने त्यात भारत आहे ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे.
जपानचा याओकी मून रोव्हर यावर्षी चंद्राच्या दिशेने प्रयाण करणार आहे. त्यासाठी युनायटेड लॉंच अलायन्स या खासगी अमेरिकन कंपनीच्या रॉकेटचा वापर होणार आहे. रशियाही पुन्हा एकदा चंद्रावर उतरायची तयारी करत आहे. त्यांच्या आधीच्या मोहिमा सोव्हिएत युनियन म्हणून पार पडल्या होत्या. त्यामुळे आता रशियाचं नाव वरच्या यादीत ठळकपणे आणण्याचा त्यांचा प्रयास आहे. हे ल्यूना-25 यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणार आहे. एकूणच या प्रदेशात वस्ती करण्यासाठी योग्य परिस्थिती असल्याने बऱ्याच मोहिमा या भागात उतरण्याचा विचार करतात.
नासाला तर याच दक्षिण भागात पूर्ण आर्टेमिस वसाहत उभी करायची आहे. त्या मोहिमेचा पहिला टप्पा म्हणून बांधकाम साहित्य घेऊन नोव्हेंबरमध्ये नासाचं ओरायन यान चंद्राच्या दिशेने कूच करणार आहे. आर्टेमिस प्रकल्पाकडे साऱ्या जगाचं लक्ष आहे आणि येती दोन-तीन वर्षे त्या दृष्टीने खूप महत्त्वाची ठरणार आहेत.
नासा आणि एलोन मस्कची कंपनी स्पेस-एक्स यांनी एकत्र काम सुरू केलेलं आहे. इंटूइटीव्ह मशीन्स ही आणखी एक खासगी कंपनी आता त्यांना सहकार्य करणार आहे. नोव्हा-सी हा त्यांचा रोबॉटिक लॅंडर, स्पेस-एक्सचं फाल्कन रॉकेट आणि त्यात नासाचं पेलोड म्हणजे साहित्य असं हे त्रिकूट 2021 मध्ये चंद्राला भेट देणार आहे.
ऍस्ट्रोबॉटिक ही आणखी एक खासगी कंपनी यावर्षी इतिहास रचणार आहे. जुलै 2021 मध्ये उड्डाण करणाऱ्या त्यांच्या रॉकेटमध्ये एक खास पेलोड आहे- जगप्रसिद्ध विज्ञानकथा लेखक आर्थर सी क्लार्क यांची रक्षा असलेली कॅप्सूल. आयुष्यभर ज्यांनी अवकाशप्रवासाची अद्भुत चित्रं आपल्यासाठी रंगवली त्या महान लेखकाला ही नक्कीच अभूतपूर्व आदरांजली होईल!