डॉ. मेघश्री दळवी
मागच्या आठवड्यात गुगलने फिटबिट विकत घेतल्यावर या उद्योगात चर्चेला उधाण आलं आहे. हातावर बांधण्याची फिटबिटसारखी स्मार्ट उपकरणं म्हणजे अंगावर विविध प्रकारे परिधान करत त्याचा वेगवेगळ्या कामांसाठी वापर करून घेण्याची साधनं. या परिधानीय (वेअरेबल) उपकरणांचा सर्वाधिक वापर वैद्यकीय कामांसाठी होताना दिसतो. आज चर्चा होण्याचं कारण म्हणजे अशा उपकरणांची वाढती मागणी आणि सोबत या क्षेत्रात दर दिवशी होणारं नवनवीन संशोधन.
सुरुवातीला ऍपलने स्मार्ट वॉच आणलं. मग हातावर बांधण्याचे फिटबिट किंवा सॅमसंगसारखी फिटनेस ट्रॅकर्स आले.
रक्तदाब, हृदयाचे ठोके, वेग मोजणारे संवेदक त्यात असतात. अशीच उपकरणं दंडावर किंवा मांडीवर लावून रक्तपरीक्षण, ग्लुकोज पातळी, ऑक्सिजन पातळी, दिवसभराचा व्यायाम, चाललेलं अंतर, पायऱ्यांची चढ-उतार, पोटात गेलेल्या कॅलरीज, झोपेचं प्रमाण हे सगळं मोजून एकंदरीत आरोग्याचा अंदाज घेता यतो. खेळाडूंना सरावाच्या काळातल्या अशा नोंदींचं विश्लेषण करून आपली कामगिरी सुधारण्यासाठी योग्य दिशा मिळू शकते. काही परिधानीय उपकरणांमध्ये ईसीजी नोंदींवरून संबंधित सूचना देणे, हवेची परीक्षा करून दम्याचा त्रास असलेल्यांसाठी इनहेलर आपोआप सुरू करणे अशा गोष्टी आता येऊ घातल्या आहेत. स्मार्ट बूट, कॅप, हेल्मेट, बॅकपॅक, दागिने, चश्मा आणि कपड्यांचीही त्यात भर पडत आहे.
सोबत चर्चा आहे ती हिअरेबलची. कानात घालायच्या या उपकरणात हृदयाचे ठोके, शरीराचं तापमान, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण, ईसीजी, आणि ईईजी नोंदण्याची क्षमता असू शकते. ही हिअरेबल्स चालण्याचा वेग, अंतर, कॅलरीज हे मोजून त्यावरून सूचना देऊ शकतात. बायोमेट्रिक ओळखपत्र म्हणूनही ती वापरता येतात. येत्या काही वर्षांमध्ये हिअरेबलचा वापर वाढत जाईल अशी अपेक्षा आहे.
गेल्या वर्षी अठरा कोटी परिधानीय उपकरणं जगभरात विकली गेलेली आहेत आणि या वर्षी त्यात सुमारे 26 टक्के वाढ होईल असा अंदाज आहे. या व्यवसायात 42 अब्ज डॉलर्सची उलाढाल अपेक्षित आहे. तरुणांमध्ये स्मार्टवॉचसारख्या उपकरणांचा वापर आवडीने केला जातो, सोबत रुग्णांसाठी त्यांचा मोठा लाभ होताना दिसून आलेला आहे. परिधानीय उपकरणं वापरून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात प्रचंड वाव आहे. विशेषत: स्मार्ट शहरामध्ये व्यक्तींना सुरक्षिततेच्या दृष्टीने ट्रॅक करणे शक्य होतं किंवा त्यांची माहिती सतत हाताशी असल्याने गुन्ह्यांना प्रतिबंध करणे शक्य होतं. काही भविष्यवेधी चित्रपटांमध्ये असे प्रसंग दाखवलेले तुम्ही पाहिले असतील.
यापुढचा टप्पा असेल अशी संवेदकयुक्त स्मार्ट साधनं थेट शरीरात बसवून घेणे. ओळखपत्र म्हणून हाताच्या पंजावर किंवा मनगटावर चिप बसवून घेण्याची काही उदाहरणं दिसतात. तापमान, रक्तदाब यासारख्या शरीरातील महत्त्वाच्या परिमाणांच्या नोंदी घेण्यासाठी म्हणून दंडात बसवायला अशा चिप्स उपलब्ध आहेत. मात्र हा ट्रेंड कुठवर जाईल हे निश्चित सांगता येत नाही.