विज्ञानविश्‍व : सत्तरीची विसडम

मेघश्री दळवी

पक्ष्यांचा अभ्यास करणं हे खूप आनंददायी असतं. त्यांचा दूरदूरचा प्रवास, कधी अंडी घालण्यासाठी पुन:पुन्हा एकाच जागी येणं, त्यांचं समाजजीवन यांचा अभ्यास करण्यासाठी अनेक तज्ज्ञ आयुष्य वाहून घेतात. एका विशिष्ट पक्ष्याचा मागोवा घेण्यासाठी त्याच्या पायात बॅंड घालून त्यावरून ठावठिकाणा शोधणं ही पद्धत अनेक वर्षांपासून रूळली आहे. अशीच एक बॅंडधारक पक्षीण विसडम नुकतीच सत्तर वर्षांची झाली. तिची गमतीदार कहाणी.

पायात लालचुटूक बॅंड मिरवणारी अल्बाट्रोस प्रकारची विसडम ही आज जगातली सर्वात जास्त वयाची वन्य पक्षी आहे. पॅसिफिक महासागरात उत्तरेकडच्या प्रवाळ बेटांवर मिडवे अटॉल नॅशनल वाइल्ड लाइफ रेफ्यूज हे वन्यजीवांचं सुरक्षित क्षेत्र आहे. पक्षीअभ्यासक तिथे नेमाने भेट देत असतात. चॅन्डलर रॉबिन्स तिथे 1956 मध्ये वन्य अल्बाट्रोसांची नोंद घेण्याच्या एका प्रकल्पावर काम करत होते. त्यांनी विसडमच्या पायात बॅंड घालून तिचा झेड333 हा क्रमांक नोंदवून ठेवला.

पुढे 2002 मध्ये रॉबिन्स पुन्हा मिडवे अटॉलला गेले असताना त्यांना एका अल्बाट्रोसच्या पायातला बॅंड झिजलेला दिसला. कुतुहलाने पाहिलं तर तो बॅंड त्यांनीच लावलेला होता, तब्बल 46 वर्षांपूर्वी! बॅंड लावतेवेळी ती अंडी घालत होती. त्यावरून तिचं वय कमीत कमी पाच वर्षे धरलं तरी रॉबिन्सना पुन्हा एकदा भेटली तेव्हा ती चक्‍क 51 वर्षांची होती!

खरं तर विसडम ज्या लायसन अल्बाट्रोस जातीची आहे, त्यांना सुमारे चाळीस वर्षांचं आयुष्यमान आहे. त्यामुळे 51 वर्षे जगलेली ही पक्षीण पाहून रॉबिन्स अगदी आनंदून गेले. त्यांनी कौतुकाने तिला नवा बॅंड लावला, विसडम असं नामकरण केलं आणि तिच्या आयुष्याचा मागोवा घ्यायला सुरुवात केली. हळूहळू ही ज्येष्ठ वयाची विसडम पक्षी अभ्यासकांच्या जगात प्रसिद्ध होत गेली आणि त्याला कारणही तसंच आहे. आपण माणसं गेली 60-65 वर्षे हवामान बदलाचे साक्षीदार आहोत. विसडमनेही या तीव्र हवामानाला आपल्या परीने तोंड दिलं असणार. कित्येक त्सुनामी, वादळं, महासागरांमधले धोके, प्लॅस्टिकचा भडिमार, आणि रोगराईतून ती टिकून राहिली ही कल्पनाच भारी रोमांचक आहे

इतक्‍या दीर्घ आयुष्यात तिने जवळजवळ पन्नास लाख किलोमीटर उड्डाण केलेलं आहे. पस्तीसहून अधिक पिल्लं वाढवली आहेत. तिचे सोबती बदलले तरी ती मिडवे अटॉलला येणं चुकवत नाही. जॉन प्लिसनर हे वन्य जीवांचे अभ्यासक म्हणतात की, दरवर्षी विसडम आलेली पाहिल्यावर माझा जीव भांड्यात पडतो. अशी स्थिती अनेकांची होते. केवळ हे अभ्यासक नव्हे तर इंटरनेटवर देखील विसडमचे प्रचंड चाहते आहेत.

अलीकडे विसडमने सत्तरी पार केली तेव्हा मात्र ते पाहायला रॉबिन्स या जगात नव्हते. दीर्घकाळ कार्यरत राहून 2018 मध्ये वयाच्या 98व्या वर्षी त्यांनी आपला निरोप घेतला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.