विज्ञानविश्‍व : शुभ्र अतिशुभ्र

डॉ. मेघश्री दळवी

पांढरा, सफेद, शुभ्र असा उल्लेख आपण सरसकट करत असतो. पण शास्त्रज्ञांच्या दृष्टीने पांढऱ्या रंगातही कमी-जास्त प्रकार असतात. उष्णता परावर्तन करण्याच्या क्षमतेच्या मुद्द्यावर ते पांढऱ्या रंगाची प्रतवारी करतात.

हे सगळं मुद्दाम सांगण्याचं कारण म्हणजे पर्ड्यू विद्यापीठातल्या एका संशोधकांच्या टीमने अलीकडेच सर्वाधिक शुभ्र रंग तयार करण्यात यश मिळवलेलं आहे. या रंगाने एखादा पृष्ठभाग रंगवला, तर तो पृष्ठभाग त्याच्यावर पडणाऱ्या प्रकाशातली 98.1 टक्‍के उष्णता परावर्तित करू शकतो.

या उच्चांकासाठी ताज्या गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये या रंगाला खास स्थान मिळालं आहे. हा विक्रम गौरवाचा असला तरी या अतिशुभ्र रंगाचं खरं महत्त्व आहे ग्लोबल वॉर्मिंगच्या दृष्टीने. पांढरा रंग हा उष्णता परावर्तित करणारा म्हणून आपण ओळखतो.

विषुववृत्ताच्या आसपासच्या परिसरात हा रंग याच कारणासाठी लोकप्रिय असतो. पांढऱ्या रंगाने रंगवलेली घरं, विशेषत: छप्परं या भागात आढळतात. नैसर्गिकरीत्या घर थंड ठेवण्यासाठी ते खूप उपयुक्‍त ठरतं. पर्ड्यू विद्यापीठात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा प्राध्यापक असलेल्या झायुलीन रुआन यांचे परिश्रम या नव्या रंगामागे आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामान बदल होतात,

आपल्या परिसराचं तापमान वाढतं, मग आपण एसी आणि पंखे जास्त वापरतो, या अधिकच्या वापरामुळे जास्त ऊर्जा खर्च होते आणि पुन्हा ग्लोबल वॉर्मिंगमध्ये भर पडते. हे दुष्टचक्र त्यांना थांबवायचं होतं. एसी आणि पंखे न वापरता घर किंवा ऑफिस थंड ठेवण्यासाठी अनेक प्रकारचं संशोधन सुरू आहे. त्यात रुआन यांनी पांढऱ्या रंगावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं.

बाजारात उपलब्ध असणारे काही पांढरे रंग हे त्यांच्यावर पडलेल्या सूर्यप्रकाशातली ऐंशी ते नव्वद टक्‍के उष्णता परावर्तित करतात. त्यामुळे त्या रंगांनी रंगवलेल्या घरात तापमान सहसा जास्त वाढत नाही. पण तेवढ्याने रुआन यांचं समाधान होत नव्हतं. त्यांना हवा होता त्याहीपुढे जाऊन घरांना शीतल करणारा परिणाम.

रुआन यांनी सतत सात वर्षे या प्रकल्पात आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन शंभरहून अधिक संयुगांवर प्रयोग केले आणि हा रंग मिळवला. त्याच्यात बेरिअम सल्फेटच्या कणांचा वापर आहे. 98 टक्‍के उष्णता परावर्तित करून तो स्वत:ही इन्फ्रारेड किरण उत्सर्जित करतो. त्यामुळे या रंगाने रंगवलेल्या घराच्या आतलं तापमान हे बाहेरच्या तापमानापेक्षा कमी होतं.

चक्‍क एसी लावल्यासारखं! एका चाचणीनुसार साधारण हजार चौरस फुटाचं छप्पर या अतिशुभ्र रंगाने रंगवलं, तर दहा किलोवॅट वापरणाऱ्या शक्‍तिशाली एसी सारखा परिणाम मिळतो. एकही वॅट न वापरता! ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम कमी करायचे असतील तर

असेच नावीन्यपूर्ण उपाय आवश्‍यक आहेत. रुआन यांच्या रंगाला अजून काही नाव नाही, पेटंट मिळाल्यावर कदाचित एखाद्या कंपनीच्या आकर्षक नावाने तो मिळायला लागेल. लवकरच आपल्याला तो वापरायला उपलब्ध होईल हीच आशा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.