मेघश्री दळवी
या वर्षीचा बराचसा भाग करोनाशी लढण्यात गेला असला, तरीही इतर तंत्रज्ञानात संशोधन वेगाने सुरू आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरवर्षी दहा टॉपच्या तंत्रज्ञानाची यादी जाहीर करत असते. हे तंत्रज्ञान एकदम नवं नसलं तरी त्यांचं उपयोजन वेगाने होत असतं आणि ते अधिकाधिक लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतं. या वर्षी या यादीत अर्थातच वैद्यकशास्त्र आघाडीवर आहे.
इंजेक्शन वापरून औषधं थेट रक्तात पोचवण्याचं तंत्र आपण कित्येक वर्षे वापरत आहोत. मात्र अनेक वेळा त्यातल्या वेदनांमुळे काही रुग्ण इंजेक्शनला नकार देताना दिसतात. वेदना टाळून इंजेक्शन कसं देता येईल यावर बराच काळ संशोधन सुरू आहे. त्यासाठी आता मायक्रोनीडल्स म्हणजे अतिसूक्ष्म सुयांचा वापर करण्याचं तंत्रज्ञान उपयोगी ठरत आहे. मज्जातंतूंच्या टोकांना टाळणाऱ्या सूक्ष्मतम सुयांमुळे वेदनारहित इंजेक्शन अनेकांना वरदान ठरू शकतं. याच सुया रक्ततपासणीसाठी देखील वापरता येतील.
करोना काळात आपल्यापैकी काहींनी वेगवेगळी ऍप्स वापरून डॉक्टरांचा सल्ला घेतला असेल. तसंच डिजिटल तंत्रज्ञान वैद्यकशास्त्रात वापरून आरोग्यसेवा अधिकाधिक रुग्णांपर्यंत नेण्याचा डिजिटल मेडिसीनचा प्रयत्न यापुढच्या काळात वेगाने वाढणार आहे. त्यात औषधी गोळ्यांमधून सेन्सर्स शरीराच्या आत पोहोचवणे आणि स्मार्टवॉचसारख्या उपकरणांचा वापर करून दुरूनच रुग्णाचं सतत निरीक्षण करणे अशा सोयींची भर पडणार आहे.
करोनावरील लसींच्या चाचण्याबाबत आपण सतत बातम्या वाचत आहोत. अशा चाचण्या प्रत्यक्ष माणसांवर न करता आभासी रुग्णांचा वापर करणं हेही लवकरच शक्य होईल. त्यामुळे माणसांचा संभाव्य धोका टळेल आणि चाचण्या अधिक वेगाने करता येतील अशी आशा आहे.
करोनामुळे आपलं लक्ष पर्यावरणाच्या संकटावरून थोडं दूर गेलं असलं, तरी पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. सूर्यप्रकाशाचा वापर प्रकाशसंश्लेषणा व्यतिरिक्त इतर कोणत्या रासायनिक अभिक्रियांसाठी करता येईल यावर दीर्घकाळ संशोधन सुरू आहे. त्यात आता आशेचा किरण दिसू लागला आहे.
खनिज इंधन टाळून केवळ सूर्यप्रकाशावर मोठ्या प्रमाणात रासायनिक उत्पादन घेता येईल असं तंत्रज्ञान लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. शून्य कार्बन उत्सर्जन असलेलं हायड्रोजन हे हरित इंधन, सिमेंट उत्पादनात घटलेलं कार्बन उत्सर्जन, आणि इलेक्ट्रिक विमानवाहतूक या आणखी तीन आशादायक बाबी या यादीत आहे.
संगणकशास्त्रात क्वांटम कम्प्युटिंगचा बोलबाला वाढतो आहे, सोबत अतिशय अचूक क्वांटम सेन्सर्स येत्या काळात महत्त्वाचे ठरणार आहेत. स्पेशिअल कम्प्युटिंगमध्ये खरं आणि आभासी जग यांची अधिक सांगड घालून माणूस आणि यंत्राचं सहजीवन एका वेगळ्याच पातळीवर जाईल अशी अपेक्षा आहे. शेवटी आहे, जैव तंत्रज्ञानात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणारं पूर्ण जीनोमचं संश्लेषण. नवीन वर्षाचं स्वागत करताना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही तंत्रज्ञानाची टॉप टेन यादी निश्चितच प्रेरणादायक ठरणार आहे.