विज्ञानविश्‍व – ते बारा जण

डॉ. मेघश्री दळवी

नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले अंतराळवीर. मागोमाग बझ अल्ड्रिननी तिथे आपल्या पाऊलखुणा उमटवल्या. त्यानंतर आणखी काही अंतराळवीर त्या अनोख्या भूमीला पाय लावून आले. आपल्याला त्यांची आठवण राहात नसली, तरी त्या बारा जणांनी खूप महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे यात संदेह नाही. आर्मस्ट्रॉंगच्या “अपोलो 11′ मोहिमेनंतर लगेचच चार महिन्यांत “अपोलो 12′ यान निघाले 14 नोव्हेंबर 1969 रोजी. पीट कॉनराड आणि ऍलन बीन हे त्यातले दोन अंतराळवीर चंद्रावर चक्‍क दोन दिवस राहिले. त्यानंतर नंबर लागतो तो ऍलन शेपर्ड आणि एडगर मिचेल या दोघांचा. त्यांच्या “अपोलो 14′ यानाचे उड्डाण झाले 31 जानेवारी 1971या दिवशी. चंद्राच्या भूगर्भातल्या हालचाली टिपण्यासाठी त्यांनी काही प्रयोग तिथे केले. कोनी विवराजवळ जाण्याचा अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला. पण दिशा आणि स्थान यांचा नीट अंदाज न आल्याने त्यांना तो प्रयत्न सोडून द्यावा लागला.

शेपर्डनी मजा म्हणून चंद्रावर गोल्फ खेळून बघितलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं नसेल, पण चंद्रावर पर्यटनउद्योग उभारताना तिथे गोल्फ खेळणं हे एक मुख्य आकर्षण असेल असा काही कंपन्यांचा आज दावा आहे! अवकाशप्रवासाने थरारून जाण्याचा काळ होता तो. पाठोपाठ सहा महिन्यांनी पुढची मोहीम गेली अपोलो 15. डेव्हिड स्कॉट आणि जेम्स आयर्विन हे दोन अंतराळवीर चांद्रभूमीवर उतरले, तो दिवस होता 31 जुलै 1971. यावेळी पहिल्यांदाच सोबत रोव्हर नेला होता. त्यामुळे आपल्या तीन दिवसांच्या वास्तव्यात त्यांनी भरपूर फिरून घेतलं आणि एकूण 77 किलो वजनाचे खडकांचे नमुने तिथून गोळा करून आणले. एप्रिल 1972 मध्ये “अपोलो 16′ मोहिमेतून गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्यूक हेही चंद्रावर तीन दिवस राहिले. त्यांनीदेखील रोव्हरमधून बराच प्रवास केला.

चंद्रावर उतरणारे शेवटचे अंतराळवीर आहेत युजिन सर्नन आणि हॅरिसन श्‍मिट. डिसेंबर 1972 मध्ये चंद्रावर पोचलेल्या या “अपोलो 17′ मोहिमेत त्यांनी तिथले नमुने गोळा केले, काही शास्त्रीय प्रयोगांची मांडणी केली आणि तीन दिवस तिथल्या परिसराची पाहणी केली. सर्नननी एका खडकावर आपल्या मुलीचं, ट्रेसीचं नाव कोरले आहे. चंद्रावर वातावरण नसल्याने वारा किंवा पाऊस नसतो आणि खडकांची नैसर्गिक झीज होत नाही. म्हणूनच अजूनही ते ट्रेसीचं नाव तिथे जसंच्या तसं असेल! गंमत म्हणजे यातले जॉन यंग आणि युजिन सर्नन हे खूप आधी “अपोलो 10′ मधून चंद्राभोवती भ्रमण करून आलेले होते. त्यावेळी जरी ते प्रत्यक्ष चंद्रावर उतरले नव्हते, तरी पुढे त्यांना ती संधी मिळालीच! या सर्व बारा जणांनी खूप काळ स्कायलॅब आणि इतर अवकाशमोहिमांची आखणी करण्यात भाग घेतला. डेव्हिड स्कॉट आणि युजिन सर्नन यांनी आपल्या अनुभवावर पुढे पुस्तके प्रकाशित केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)