विज्ञानविश्‍व – झेप सॅटर्न रॉकेटची 

डॉ. मेघश्री दळवी 

हे वर्ष आहे “अपोलो 11′ चांद्रमोहिमेचं सुवर्णमहोत्सवी वर्ष. त्यानिमित्ताने या मोहिमेच्या बऱ्याच आठवणी जागवल्या जात आहेत. त्यासाठी गमतीजमतीचे कार्यक्रमही आखले जात आहेत. त्यातला एक आहे सॅटर्न-पाच या रॉकेटचा. तीन टप्प्यांच्या या रॉकेटचा वापर करून “अपोलो 11′ यानाने अंतराळात झेप घेतली होती. तो दिवस होता 16 जुलै 1969.
दुपारी 1 वाजून 32 मिनिटांनी या रॉकेटचं उड्डाण झालं. सोबतच्या यानात होते तीन अंतराळवीर- नील आर्मस्ट्रॉंग, बझ अल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स. आधीच्या अपोलो मोहिमांमध्ये नासाने काही यश पाहिलं होतं आणि काही अपयशदेखील झेललं होतं. त्यामुळे ही मोहीम खूप महत्त्वाची होती.

सॅटर्न-पाच रॉकेट उडालं, ते दृश्‍य पाहायला लाखो मंडळी जमली होती. अर्थात, प्रत्यक्ष तळावर यायला बंदी असल्याने लोकं जवळच्या हमरस्त्यांवर आणि बीचवर गोळा झाली होती. उड्डाण यशस्वी झालं, योग्य वेळी यान रॉकेटपासून वेगळं झालं, चंद्रापर्यंत पोहोचलं आणि पुढचा इतिहास रचला गेला. त्या दिवसाची खास आठवण म्हणून येत्या 16 जुलै 2019 रोजी एक आगळंवेगळं सॅटर्न-पाच रॉकेट उड्डाण करण्यासाठी सज्ज आहे. पण खरंखुरं नव्हे तर व्हर्च्युअल!

या सोहळ्यासाठी वॉशिंग्टनमधल्या स्मिथसोनियन एयर अँड स्पेस म्युझियमने प्रचंड तयारी केली आहे. एखाद्या उभ्या स्तंभावर त्यांना सॅटर्न-पाच रॉकेटचं रूप प्रक्षेपित करायचं होतं. त्यासाठी त्यांनी निवड केली चक्‍क वॉशिंग्टन मॅन्युमेंटची! साडेपाचशे फुटाहूनही अधिक उंच अशा या प्रसिद्ध स्तंभाची छायाचित्रं तुम्ही पाहिली असतील. त्याचंच आता 363 फुटी सॅटर्न-पाच रॉकेटमध्ये व्हर्च्युअल रूपांतर होणार आहे. 16, 17 आणि 18 जुलैच्या रात्री हे नवलाईचं रूप पाहायला भरपूर गर्दी लोटणार आहे. जोडीला काऊंटडाउनसाठी नासा जे चाळीस फूट रुंदीचं आडवं डिजिटल घड्याळ वापरते, तेही या वॉशिंग्टन मॅन्युमेंटजवळ उभारण्यात येईल.

मग पुढे 19 आणि 20 जुलैला सॅटर्न-पाच रॉकेटचं व्हर्च्युअल उड्डाण होईल. “अपोलो 11′ उड्डाणाची उपलब्ध चित्रफीत आणि साथीला स्पेशल इफेक्‍ट्‌स वापरून तयार केलेला त्रिमित चित्रपट त्यावेळी तिथे दाखवणार आहेत. अनेक तज्ज्ञ आणि अनुभवी तंत्रज्ञांनी एकत्र येऊन या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शक्‍य तितका खराखुरा जिवंत अनुभव द्यायचा त्यांचा प्रयत्न आहे. नव्या पिढीला त्या काळची ओळख करून द्यायची आणि ज्यांनी ते उड्डाण पूर्वी टीव्हीवर पाहिलं होतं, त्यांना त्या रोमांचक दिवसाची आठवण जागी करून द्यायची या दुहेरी हेतूने हा कार्यक्रम आखला आहे.

“अपोलो 50- गो फॉर द मून’ या नावाने हा दिमाखदार सोहळा साजरा होणार आहे. 50 वर्षांपूर्वीची सॅटर्न-पाच रॉकेट उड्डाणाची ती झेप पुन्हा एकदा अनुभवायला सगळे उत्सुक आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.