जगाची लोकसंख्या जशी वाढत जाईल, तशी या लोकसंख्येला पुरेसं अन्न पुरवण्याची समस्या वाढत जाणार आहे. एकीकडे शेतीसाठी उपलब्ध जमीन कमी होत आहे. दुसरीकडे रासायनिक खतं आणि कीटकनाशकं यांच्या अमर्याद वापरामुळे या जमिनीचा कसही घटतो आहे. हवामानबदलाचे तडाखे सोसताना पीक उत्पादन बेभरवशाचं होत चाललं आहे. तर अन्नधान्यावर प्रक्रिया करताना त्यातलं पोषणमूल्य घसरत आहे. त्यासोबत अन्न उत्पादनाचा कार्बन फूटप्रिंट कमी करत जाण्याचं आव्हान तर आहेच. चहूबाजूंनी असे पेच उभे राहात असताना अन्नपुरवठा हा येत्या काळातला खूप मोठा प्रश्न होणार आहे.
अशा परिस्थितीत एकदम हटके विचार करणं खरोखरीच गरजेचं होत चाललं आहे. मांस उत्पादनाचा कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी प्रयोगशाळेत कृत्रिम प्रोटीन निर्माण करण्यात यश आलं आहे. जोडीला सोलैन हा नवा पर्याय आता आकार घेतो आहे. काय आहे हे सोलैन? फिनलॅंडमधील सोलर फूड्स या कंपनीचं सोलैन अक्षरश: हवेतून निर्माण केलं जातं. हो, हवेतून. पण ही जादू नाही तर हवेतले घटक अतिशय हुशारीने वापरण्याची किमया आहे. वातावरणातला कार्बन डायऑक्साइड म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन. वातावरणात पाण्याची वाफ असते. त्यातले घटक आहेत हायड्रोजन आणि ऑक्सिजन. कार्बोहायड्रेट किंवा प्रोटीनमधले मुख्य घटकही तेच आहेत- कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. तेव्हा हवा आणि पाणी यांच्यावर इलेक्ट्रिक प्रक्रिया करून या कंपनीने सोलैनपावडर तयार केली आहे. सुमारे सत्तर टक्के प्रोटीन, पंधरा टक्के
कार्बोहायड्रेट फायबर स्वरूपात, पाच टक्के मिनरल्स आणि पाच-दहा टक्के मेद सोलैनमध्ये आहे.
सोलैन तयार करताना कार्बन कॅप्चर तंत्रज्ञान वापरून हवेतून कार्बन डायऑक्साइड वेगळा केला जातो. त्यात पाणी, व्हिटामिन्स यांची भर घातली जाते. प्रत्येक टप्प्यावर पर्यावरणस्नेही सौर ऊर्जेचा वापर होतो. सोलैनचं उत्पादन कार्बन-न्यूट्रल आहे, म्हणजे या उत्पादनात जेवढा कार्बन डायऑक्साइड निर्माण होतो, तेवढाच वापरला जातो आणि वातावरणातल्या कार्बन डायऑक्साइडमध्ये कोणतीही भर पडत नाही. कारखान्यात निर्मिती होत असल्याने उत्पादन हवामानावर थेट अवलंबून नाही. किमतीचा विचार केला तर ती साधारण सोयाच्या जवळ जाते असा कंपनीचा दावा आहे.
ब्रेड, पास्ता, केकमध्ये सोलैन वापरून पाहिली असता, चव चांगली असल्याचं प्रयोगाने सिद्ध झालं आहे. गेल्या वर्षी ही पावडर युरोपमधल्या मोजक्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध झाली आहे. प्रोटीन शेक आणि योगर्ट यांच्यात काही कंपन्यांनी सोलैनचा वापर सुरू केला आहे. येत्या वर्षात मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी कारखाना उभा राहणार आहे. कृत्रिम मांस आणि सोलैनसारखं पीठ ही जोडगोळी आपल्याला अन्न पुरवठा आणि पर्यावरणाचे प्रश्न अशा दोन्ही आघाड्यांवर उपयोगी ठरणार आहे. तेव्हा उद्या आपण सोलैनपराठा अगदी आवडीने खात असू!
डॉ. मेघश्री दळवी