विज्ञानविश्‍व: तीसुद्धा शिकार करायची

मेघश्री दळवी

इतिहासाच्या नोंदी उपलब्ध असल्या की, काही ठाम विधानं करता येतात. पण त्याही आधीच्या प्रागैतिहासिक काळाबाबत निश्‍चित माहिती मिळवणे कठीण असतं. अशा वेळी उत्खननातून मिळालेल्या खुणा, वस्तू, हाडं, किंवा गुंफाचित्रं यातून काढलेले निष्कर्ष हेच आधारभूत मानले जातात. पाषाण युगात पुरुष शिकारीसाठी एकत्र दूरवर जात असत आणि स्त्रिया जवळपास मिळणारी फळं, बिया, कंदमुळं गोळा करून आणत असत, अशी श्रमविभागणी होती. हा एक निष्कर्ष आपण कित्येक वर्षं ग्राह्य धरत आलो आहोत. स्त्रिया फार दूरवर न जाता आपल्या टोळीतील मुलं, वयस्कर व्यक्‍ती आणि आजारी माणसांची काळजी घेत असतील हाही त्याला जोडून आलेला विचार.

मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या या धारणेला छेद जातो आहे. आदिमानवाच्या काळी कामांची इतकी काटेकोर विभागणी नव्हती. स्त्रियाही शिकारीत भाग घेत असत या विचारांना बळकटी मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी पेरूमधील अँडीज पर्वतांमध्ये एका ठिकाणी उत्खनन सुरू होतं. पुरातत्वशास्त्र म्हणजे आर्किऑलॉजी या विषयातले काही संशोधक त्यावर काम करत होते. तिथे पाषाणयुगातलं एक थडगं उकरताना सुमारे नऊ हजार वर्षांपूर्वीचे हाडांचे अवशेष त्यांना मिळाले.

त्यासोबत वीस लहानमोठी दगडी हत्यारं होती. धारदार पाती, भाल्याला लावायची तीक्ष्ण टोकं- ही सगळी आयुधं पाहून तो एक तरबेज शिकारी असणार आणि नियमितपणे वेगवेगळ्या प्राण्यांच्या शिकारीसाठी जात असणार असं अनुमान संशोधकांनी काढलं. अशा निष्णात शिकाऱ्यांसोबत त्यांची हत्यारं विधिपूर्वक पुरली जायची. या सन्मानाचा अप्रत्यक्ष फायदा म्हणजे आज आपल्याला उत्खननात अशा प्रकारची अनेक हत्यारं मिळतात आणि त्यातून त्याकाळचा जीवनपद्धतीचा पट उभा करायला प्रचंड आधार मिळतो.

बायोआर्किऑलॉजिस्ट जिम वॉटसन यांचं लक्ष मात्र त्या हाडांकडे होतं. एवढी काटकुळी आणि हलकी हाडं, पण ती पूर्ण वाढ झालेली व्यक्‍तीची, याचा अर्थ त्यांच्या मते एकच होता- तो तरबेज शिकारी पुरुष नसून स्त्री होती. त्या सांगाड्याचा पूर्ण अभ्यास केल्यावर इतर संशोधकांनी वॉटसन यांच्या मताला उचलून धरलं. कवटीतल्या दातांमधल्या पेप्टाइड्‌सच्या विश्‍लेषणावरून तो सांगाडा एका स्त्रीचा होता हे निश्‍चित झालं. ती सतरा-अठरा वर्षांची सडपातळ तरुणी शिकारीत पारंगत होती आणि त्यातच तिचा अंत झाला असावा यावर संशोधकांचं एकमत झालं.

तिथेच न थांबता संशोधकांच्या त्या गटाने परिसरातल्या आणखी दहा साइट्‌सवर मिळालेल्या सांगाड्यांच्या विश्‍लेषणाला पुन्हा एकदा हात घातला. त्या सगळ्या प्रागैतिहासिक शिकारी स्त्रियाच होत्या. याचा अर्थ केवळ जवळपास फिरून फळं वगैरे गोळा करणं या पलीकडे अनेक स्त्रिया शिकारीत भाग घ्यायच्या. इतकंच नव्हे तर त्या शिकारीत अत्यंत प्रवीण असायच्या. त्यामुळे कामांमध्ये स्त्रीपुरुष भेद त्यावेळी तितकासा ठळक नसावा, असं मत आता काही तज्ज्ञ मांडत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.