fbpx

विज्ञानविश्‍व : पुन्हा एकदा वाचलो!

मेघश्री दळवी

मागच्याच आठवड्यात पृथ्वीवरचा आणखी एक धोका टळला. ऑक्‍टोबर 16 रोजी दोन जुनी अवकाशयाने पृथ्वीच्या एकदम जवळ आली होती. जवळ म्हणजे किती? तर अवघ्या हजार किलोमीटर अंतरावर. ही दोन यानं पृथ्वीच्या इतक्‍या निकट आली एवढीच धास्ती नव्हती, तर त्यांची एकमेकांशी टक्‍कर व्हायची शक्‍यतादेखील प्रचंड होती.

एकतीस वर्षांपूर्वी सोडलेला रशियाचा एक उपग्रह आणि अकरा वर्षांपूर्वी चीनने अवकाशात पाठवलेलं रॉकेट बूस्टर हे दोन्हीही आपल्या अगदी जवळ येऊन गेले. समजा, एका विशिष्ट स्थितीत दोन्ही एकमेकांवर आदळले असते तर काय झालं असतं? दोघांचेही तुकडे तुकडे होऊन विखुरले असते आणि पृथ्वीभोवती फिरणारे सुमारे 2 हजार 700 उपग्रह आहेत, त्यांच्यापैकी कोणाहीवर जाऊन आदळले असते.

आज आपण दिशादर्शन, दळणवळण यासाठी सतत या उपग्रहांची मदत घेत असतो. ते बिघडले असते तर इथे पृथ्वीवर बराच हाहाकार उडाला असता. त्याहीपुढे जाऊन उपग्रहांची मोडतोड झाली असती आणि त्यांचेही तुकडे इतस्तत: उडाले असते तर? एक प्रकारची साखळी सुरू होऊन आपली पूर्ण उपग्रह यंत्रणा कोलमडून गेली असती. पण यावेळी आपण पुन्हा एकदा वाचलो!

उपग्रहांचे तुकडे इतर उपग्रहांवर आदळून त्यांचेही तुकडे होत जाणे याला “केसलर इफेक्‍ट’ म्हणतात. हा धोका आपल्यासाठी सतत वाढताना दिसतो आहे. या वर्षी जानेवारीत एक निवृत्त केलेली अवकाश दुर्बीण आणि एक प्रायोगिक पेलोड यांची टक्‍कर होणार होती. ती सुदैवाने टळली. अशी धोक्‍याची वेळ याआधीही अनेकदा आली आहे, पण दर वेळी अशी सुटका होणार नाही. एरव्हीही अनेक लहानमोठ्या अशनी उपग्रहांवर किंवा थेट पृथ्वीवर आदळू शकतात.

निअर अर्थ ऑब्जेक्‍टस म्हणजे पृथ्वीच्या जवळ येऊ शकतील, किंवा येणार आहेत, अशा अवकाशातल्या वस्तूंचं जगातल्या अनेक वेधशाळा सतत निरीक्षण करत असतात. त्यात जुन्या उपग्रहांची जोखीम अधिक आहे. यावेळी रशियन उपग्रह आणि चिनी रॉकेट बूस्टर यांचं संकट येऊन गेलं. या जुन्या यानांमध्ये दिशा बदलणे किंवा वेग बदलणे यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना किंचित धक्‍का देऊन त्यांची कक्षा बदलण्याचा उपाय देखील शक्‍य नाही.

नवीन उपग्रह अवकाशात सोडताना आज मात्र या गोष्टीची काळजी घेतली जाते. त्यांचं काम संपलं की त्यांची कक्षा खाली आणून त्यांना पृथ्वीच्या दिशेने खेचता येतं. बहुतेक वेळा हे उपग्रह वातावरणात पुन्हा प्रवेश करतात तेव्हा जळून खाक होतात.

पृथ्वीभोवती फिरणाऱ्या वस्तूंची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे त्यात नवीन वस्तूची भर घालताना तिचा सुरक्षित अंत करण्याचं नियोजन आज केलं जातं. पण तरीही पृथ्वीभोवती फिरताना या वस्तू एकमेकांवर आदळण्याचा धोका राहतोच. आज ना उद्या बहुधा अवकाशातही ट्रॅफिकचे नियम लावावे लागणार!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.