विज्ञानविश्‍व : पोर्टेबल पवनचक्‍क्‍या

मेघश्री दळवी

पारंपरिक ऊर्जेला पर्याय म्हणून सौरऊर्जा आणि पवनऊर्जा आज आघाडीवर आहेत. सौरऊर्जा आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळवता येते, तशी छोटे छोटे सौर घट गच्चीवर लावून आपल्यापुरती देखील मिळवता येते. पवनऊर्जेबाबत मात्र थोडी अडचण होते. एक तर वाहता वारा कुठे मिळेल हे पाहून पवनचक्‍क्‍या उभाराव्या लागतात. त्यांना भरपूर मोकळी जागा लागते. त्यातून पवनचक्‍क्‍या आकाराने बऱ्याच मोठ्या असतात. त्यांची पाती लांबट असतात आणि बॅटरीचं वजन भारी असतं. त्यामुळे गच्चीवर एखादी पवनचक्‍की उभारणं कठीण होतं. अशा वेळी या सहज उपलब्ध होणाऱ्या ऊर्जेला मात्र आपण सहज, हवं तसं वापरू शकत नाही.

या अडचणीवर एक चांगला उपाय आता संशोधकांनी शोधून काढला आहे- पोर्टेबल पवनचक्‍क्‍या. ही छोटी पवनचक्‍की एक किलोवॅट इतकी विद्युतशक्‍ती निर्माण करू शकते. तिच्यात गोलाकार पातं असल्याने ते वाकणे किंवा वेडंवाकडं होण्याचा धोका नाही. अर्थात इतरांनाही त्या पात्यापासून धोका नाही. हवा आत आल्यावर एका मार्गिकेतून ती गोल गोल फिरत वेगाने पात्यावर धडकेल अशी त्यात व्यवस्था आहे. त्यामुळे शहरी भागात वाऱ्याचा वेग कमी मिळाला तरी ही पवनचक्‍की त्यापासून बऱ्यापैकी कार्यक्षमतेने ऊर्जा मिळवू शकते.

घनदाट लोकवस्ती असेल अशा ठिकाणीदेखील ही छोटी पोर्टेबल पवनचक्‍की वापरता येईल. वाऱ्याची दिशा पाहून त्याप्रमाणे ती हवी तशी हलवता येईल. काही ठिकाणी गरज वाटल्यास ती कायमची बसवतासुद्धा येईल. सौर घट घराघरात बसवता आले तरी शहरात सलग सूर्यप्रकाश मिळेलच असं नाही. उत्तर युरोपात किंवा अमेरिकेच्या उत्तरेला वर्षातून काही महिनेच चांगला सूर्यप्रकाश मिळतो. 

अशा प्रदेशांमध्ये सौरऊर्जेपेक्षा पवनऊर्जा जास्त सोयीची आणि जास्त खात्रीची वाटते. लंडन किंवा टोरंटोमध्ये घरगुती सौर घटांपेक्षा पोर्टेबल पवनचक्‍की चौपट जास्त ऊर्जा पुरवू शकेल, असा या संशोधकांचा दावा आहे. तुलनेत विषुववृत्ताच्या जवळ असल्यास पोर्टेबल पवनचक्‍की सौर घटांच्या दीड ते दोन पट ऊर्जा मिळवू शकेल. आज जगाला जेवढी एकूण ऊर्जेची गरज आहे त्यापैकी पाच टक्‍क्‍यांहून अधिक गरज पवनऊर्जा भागवते आहे. घरोघरी छोट्या पवनचक्‍क्‍या आल्यास हे प्रमाण आणखी वाढू शकेल.

या सगळ्या धडपडीतून एक गोष्ट निश्‍चितच लक्षात येते. खनिज इंधनं संपत आली आहेत. त्यांच्या वापरातून प्रचंड प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. अशा वेळी संशोधक पर्यावरणस्नेही आणि स्वच्छ ऊर्जेचे नवनवीन मार्ग शोधून काढत आहे. कोणी सांगावं, उद्या प्रत्येक घर आपली ऊर्जा निसर्गाकडून अशीच सोप्या पद्धतीने मिळवेल. मग एके काळी आपण खरोखरच औष्णिक ऊर्जा वापरत होतो का या कल्पनेने आपण स्वत:च अचंबित होऊन जाऊ!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.