विज्ञानविश्‍व : प्राण्यांचे सोशल डिस्टन्सिंग

-डॉ. मेघश्री दळवी

“सोशल डिस्टन्सिंग’ हा वाक्‍प्रयोग आपण गेले काही महिने ऐकतो आहोत. घरात कोंडून राहणे, बाहेर पडल्यास पदोपदी अंतर राखण्याचा प्रयास करत आपली दैनंदिन कामं पार पाडणे हे कष्टप्रद आहे खरं. पण संसर्गाचा धोका टाळण्यासाठी कमीत कमी तीन फूट अंतर आवश्‍यक आहे हे अनेक शास्त्रीय प्रयोगांमधून सिद्ध झालं आहे. माणूस बुद्धिमान असल्याने आज ना उद्या या रोगावर खात्रीशीर इलाज आणि लस मिळेल, अशी आपल्याला आशा आहे, आणि ती रास्तही आहे. पण निसर्गातल्या इतर प्राणिमात्रांना मात्र हे उपाय अप्राप्य असतात. त्यामुळे एखादी साथ पसरलीच तर त्यांच्यासाठी खात्रीचा पर्याय आहे- सोशल डिस्टन्सिंग.

कीटक, पक्षी आणि वानरगण हे एखाद्या रोगाच्या साथीला कसं तोंड देतात यावर संशोधन झालेलं आहे. कोणी आजारी असल्याची शंका येताच ते खात्री करून घेतात. आजारी सदस्याची लक्षणं तपासतात, वास घेतात, हालचालींचं निरीक्षण करतात. जास्त सदस्य आजारी पडायला लागल्यावर विलगीकरणाची प्रक्रिया सुरू करतात. लॉबस्टर्स एरव्ही गटाने फिरत असले, तरी अशा वेळी तत्काळ आजारी सदस्यापासून दूर जाताना दिसले आहेत. गप्पी माशांमध्येही अशीच वागणूक आढळली आहे. मुंग्या सोशल डिस्टन्सिंग थोड्या वेगळ्या प्रकारे हाताळतात. मुंग्यांचं वारूळ गच्च भरलेलं असतं. तिथे कोणत्याही प्रकारचं अंतर ठेवणं जवळजवळ अशक्‍य असतं. त्यामुळे आजारी मुंग्या आपणहून दूर राहतात, प्रसंगी वारूळ सोडतात.

निरोगी मुंग्या आपल्या राणीला कोणताही संसर्ग होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतात. राणी मुंगीभोवती निरोगी मुंग्यांचा जसा संरक्षक वेढा असतो तसाच वेढा अंडी, अळ्या, आणि त्यांच्या दायांभोवती असतो. बाहेर पडून अन्न गोळा करणाऱ्या कामकरी मुंग्यांना अंतर्भागात पूर्ण मज्जाव असतो. हे सगळे उपाय अत्यंत परिणामकारक असतात आणि बहुतांशी वेळा अशा वसाहती रोगाच्या विळख्यातून वेगाने मुक्‍त होताना आढळल्या आहेत.

वानरांच्या गटातही साधारण असंच वर्तन दिसून येतं. पण मुंग्यांच्या तुलनेत उत्क्रांतीच्या वरच्या टप्प्यावर असलेले वानर आपल्या गटातल्या आजारी वानरांची काळजी घेताना दिसतात. खाणं आणून देणे, सोबत करणे यातून ते आपली कर्तव्यभावना निभावताना दिसतात. त्याच वेळी स्पर्श टाळणे, शक्‍य तितकं अंतर राखणे या गोष्टी ते विसरत नाहीत.

फिंच पक्ष्यांच्या एका गटावर याच दृष्टीने काही पक्षीतज्ज्ञांनी संशोधन केलं आहे. निरोगी पक्षी आजारी पक्ष्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला रोगाची लागण होऊ नये यासाठी दक्ष असतात, असा त्यातून निष्कर्ष काढण्यात आला. चिंपांझीच्या गटात गरज पडल्यास आजारी चिंपांझींना जबरदस्तीने बाहेर काढण्यात येतं. कोणताही सजीव नेहमी स्वत:चा जीव वाचवून राहण्याचा प्रयत्न करतो या सर्वसाधारण निरीक्षणाशी हे निष्कर्ष जुळतात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग हा निसर्गानेच बहाल केलेला उपाय. आपण तो फक्त काटेकोरपणे पाळायचा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.